मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खरमरीत उत्तर दिल्यानंतर या वादात आता प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आहे.शिवसेनेने आपले हिंदुत्व सोडलेले नसून, शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायम आहे.फक्त महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपात सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई सुरू आहे,अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
राज्यात बार सुरू झाले मात्र मंदिर बंद असल्याच्या मुद्द्यावर भाजपने राज्यात आंदोलन सुरू केले आहे.त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंदिरे सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी हिंदुत्वाबाबत उल्लेख केला आहे.यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपालांना खरमरीत पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या पत्रानंतर भाजपने शिवसेना आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर या वादात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आहे. ठाकरे सरकारने राज्यातील मंदिरे सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार मंदिरे सुरू न करून इतर पक्षांना आंदोलन करण्याची संधी देत असल्याने राज्य सरकारने मंदिरे सुरू करण्याचा निर्णय लवकरात लवकर निर्णय घ्यावा,अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
त्यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्रव्यवहारावरही आपले मत व्यक्त केले.राज्यपाल कोश्यारी यांची भूमिका योग्यच असून,केंद्र सरकारच्या निर्णयाचे पालन होते की नाही,हे पाहण्याचा आणि मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा अधिकार त्यांना आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना जे प्रत्युत्तर दिले आहे. त्याचा आशय केवळ मंदिर उघडण्याबाबतचा आहे, असे सांगतानाच राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या पत्रव्यवहारात अदब पाळला गेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंदिरे सुरू करण्यासाठी भाजपने सुरू केलेल्या आंदोलनाला आमचा पाठिंबा नाही, असेही आंबेडकर यांनी सांगितले. शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायम असून राज्यात शिवसेना आणि भाजपात सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई सुरू आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रपती राजवटीबाबत खळबळ उडवून देणारे विधान काल केले होते. महाराष्ट्रात डिसेंबर महिना सुरू होण्याआधी राष्ट्रपती राजवट लागू होईल’,असे भाकीत करून प्रकाश आंबेडकर वर्तविले होते. राष्ट्रपती राजवटीचा निर्णय कोणत्या आधारावर होणार आहे, याचा तर्कही प्रकाश आंबेडकर यांनी लावला आहे. केंद्र विरुद्ध महाराष्ट्र सरकार या संघर्षातून राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागेल, असे आंबेडकर यांनी सांगितले होते.