मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील मंदिरे सुरू करण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे.मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील भाषा आणि वक्तव्यावरून काँग्रेसचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यातील मंदिरे सुरू करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रात वापरलेली भाषा आणि वक्तव्यावरून नाराजीचा सुर उमटत असतानाच आता काँग्रेसचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे.राज्यपालांनी या पत्रातून राज्यघटना आणि मूलभूत तत्वाला हात घातला आहे.त्याचे हे वक्तव्य, भाषा ही घटनेच्या विरोधात आहे असे सांगतानाच त्यांचे हे वक्तव्य राष्ट्रपतींना मान्य आहे का हे विचारावे लागेल असेही थोरात यांनी म्हटले आहे.त्यांनी या मुद्द्यावरून भाजपलाही टोला लगावला आहे.गोव्यात अशीच स्थिती मग तिथे त्यांनी मंदिर उघडा म्हणून पत्र दिले का ? असा टोलाही त्यांनी लगावला आहे.कोरोना काळात मुख्यमंत्र्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून आपली जबाबदारी पाडली आहे.त्याचे याबद्दल कौतुक करायला हवे होते परंतु त्यांनी तसे केले नाही.राज्यपाल हे वडीलधारी आहेत, त्यांच्यावर मी व्यक्तिगत टीका करणार नाही,पण त्यांनी काळजी घ्यायला हवी होती.मंदिरात गर्दी खूप असते.त्यामुळे कोरोना आणि त्याचा धोका वाढू शकतो.सरकार म्हणून आम्ही काळजी घेत आहोत असेही थोरात म्हणाले.
केंद्र सरकारने घाईघाईने तीन शेतकरी कायदे मंजूर केले आहेत त्याचा आम्ही काळे कायदे म्हणून उल्लेख करतो. या काळ्या कायद्यांविरोधात काँग्रेसने महाराष्ट्रातही आंदोलन सुरु केले आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून आता १५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात शेतकरी बचाओ व्हर्च्युअल रॅली आयोजित केली आहे. या रॅलीचे १० हजार गावात एकाचवेळी आयोजन केले जाणार आहे. सोशल मीडियावरही ही रॅली पाहता येईल अशी व्यवस्था करण्यात आली असून ५० लाख शेतकऱ्यांपर्यँत पोहचण्याचा प्रयत्न आहे. अशी माहितीही यावेळी थोरात यांनी दिली.केंद्र सरकारने लादलेल्या या काळ्या कायद्यांना राष्ट्रवादी काँग्रेसनेही विरोध दर्शवला आहे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतही या विषयावर बैठक झाली आहे. भाजप सरकारने बहुमताच्या जोरावर लोकशाही व संसदेचे सर्व नियम पायदळी तुडवून शेतक-यांवर हे कायदे लादले आहेत. उद्योगपतींच्या फायद्यासाठी आणलेल्या या काळ्या कायद्यांमुळे देशातील शेतकरी उद्धवस्त होणार असून शेतक-यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा हा डाव आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
केंद्र सरकारच्या या काळ्या कायद्यांविरोधात काँग्रेस पक्षाचे आंदोलन सुरु असून १५ ऑक्टोबरला संध्याकाळी ४ वाजता शेतकरी बचाओ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी बचाव रॅलीचा प्रमुख कार्यक्रम राज्यातील पाच ठिकाणी असणार आहे. हे सर्व कार्यक्रम एकमेकाशी इंटर कनेक्ट असून पाच वेगवेगळ्या ठिकाणांहून काँग्रेस नेते राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. संगमनेर येथील मुख्य कार्यक्रमाला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व गुजरातचे प्रभारी खा. राजीव सातव आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी बी. एम. संदीप यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.दुसरा कार्यक्रम औरंगाबाद येथे होणार असून या रॅलीला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष, माजी मंत्री बसवराज पाटील हे उपस्थित राहणार आहेत. तर अमरावती येथील शेतकरी बचाव रॅली महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. नागपूरमध्ये ऊर्जा मंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, मदत व पुनवर्सन व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत ही रॅली संपन्न होणार आहे तर कोकण विभागातील रॅली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुझ्झफर हुसेन यांच्या उपस्थितीत होणार आहे असेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या काळ्या कायद्याविरोधात काँग्रेसने याआधी २६ सप्टेंबर रोजी- #SpeakUpForFarmers ही ऑनलाईन मोहीम राबविली होती. राज्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतक-यांनी काळे कायदे मागे घ्यावेत अशी मागणी करणारे व्हीडीओ, फोटो, संदेश सोशल मीडियावर म्हणजेच फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम, यू ट्यूबवर पोस्ट केले. या ऑनलाईन मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. २ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी किसान मजदूर बचाव दिवस पाळण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने २ ऑक्टोबरला ‘किसान-मजदूर बचाओ दिवस’ काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाळला. राज्यातील सर्व जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन तसेच मोर्चे काढून शेतकरी काळे कायदे मागे घेण्याची मागणी केली. राज्यातील सर्व जिल्हा व तालुका मुख्यालयी हे आंदोलन करण्यात. राज्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. केंद्र सरकार हे काळे कायदे रद्द करेपर्यंत काँग्रेसचा हा संघर्ष सुरुच राहील, अशी ग्वाही थोरात यांनी दिली.