कोरोनाची नोव्हेंबरमध्ये आणखी लाट येण्याची शक्यता : जयंत पाटील

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील मंदिरे सुरू करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे.मात्र राज्याचे जलसंपदामंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंदिरे सुरू न करण्याचे कारण आज स्पष्ट केले आहे.कोरोनाची नोव्हेंबरमध्ये आणखी लाट येण्याची शक्यता आहे.त्यामुळे सांभाळून पावले टाकली पाहिजेत असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आज झालेल्या ओबीसी सेलच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.राज्यातील मंदिरे सुरू करण्यात यावी या मागणीसाठी भाजपने राज्यभर आंदोलन केले आहे.त्यावर बोलताना पाटील म्हणाले की,काही राजकीय पक्ष मंदीर उघडा अशी मागणी करीत आहेत. परंतु महाराष्ट्रात जेवढे आम्ही सुरू करीत आहोत तेवढा कोरोना वाढला आहे.त्यामुळे एकत्रित माणसं गोळा होण्याचे टाळलं पाहिजे. सर्व धर्माच्या देवांनी लोकांनी गर्दी करु नका हे स्वीकारले आहे. आम्ही उपजीविकेची साधने सुरू केली आहेत. नवरात्र उत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करावा असे स्पष्ट केले आहे. आम्ही मर्यादित तत्वावर काम करतोय.त्यामुळे सर्वच धर्मांना विनंती करतोय. ज्यांना धर्माशिवाय जमत नाही ते धर्माचे राजकारण करत आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

कोरोनाची नोव्हेंबरमध्ये आणखी लाट येण्याची शक्यता आहे.त्यामुळे सांभाळून पावले टाकली पाहिजेत असेही जयंत पाटील म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार आहे असा गैरसमज विरोधकांकडून पसरवला जात आहे. मात्र असा धक्का लावलेला आम्हीही सहन करणार नाही हे लक्षात घ्या असे सांगतानाच महाराष्ट्रात अशा कोणत्याही कृतीला किंवा घटनांना राष्ट्रवादी पाठबळ देणार नाही असेही पाटील यांनी आज झालेल्या ओबीसी सेलच्या आढावा बैठकीत स्पष्ट केले.

येवला येथे आजच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केले होते.ज्या धर्मात जनावरांसारखी वागणूक मिळते त्या धर्मात राहणार नाही. तो हा १३ ऑक्टोबर दिवस असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. ओबीसींना आरक्षण देणार हे जालना येथे शरद पवार यांनी जाहीर केले होते.त्यांनतर एका महिन्यात आरक्षणाची घोषणा करण्यात आली. अठरापगड जातींना आरक्षण मिळाले पाहिजे म्हणून आरक्षण लागू केले त्यावेळी सुप्रीम कोर्टानेही त्यावर शिक्कामोर्तब केले होते असेही भुजबळ यांनी सांगितले. ओबीसींना १७ टक्के आरक्षण आहे. ओबीसी ही जात नाही तर वर्ग आहे. आरक्षण गरीबी हटाव नाही तर हजारो वर्षे ज्या जातींवर जुलुम झाला त्या जातींना सक्षम करण्यासाठी आहे. शाहू महाराजांनी राज्यकर्ते म्हणून त्यावेळी आरक्षण दिले त्यानंतर बर्‍याच वर्षांनी राज्यकर्ते म्हणून शरद पवार यांनी आरक्षण दिले याची आठवण भुजबळ यांनी करुन दिली.
ओबीसी समाज ४०० जातींमध्ये विभागला गेला आहे. या समाजात अनेक नेते आहेत. हा दबलेला समाज आहे. तो एकत्र यायला तयार नाही. मात्र आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करायला हवे कारण आपला नेता सर्वांचा विचार करणारा,सर्वांना न्याय देणारा नेता आहे.सर्वच क्षेत्रात पवारसाहेबांनी आपला ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रावर कोणतेही संकट येवू दे पहिल्यांदा तिथे धावणारा असा आपला नेता आहे. त्यामुळे पवारसाहेबांना शक्ती देवुया आपल्याला शक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या असेही भुजबळ म्हणाले. बोर्ड लावून किंवा कार्ड छापून काही होणार नाही. तुम्हाला त्यामुळे ओळखणार नाही म्हणून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी काम करा असे आवाहन भुजबळ यांनी केले.

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेस बिहारची निवडणूक स्वबळावर लढवणार
Next articleराज्यपालांची भाषा आणि वक्तव्य घटना विरोधी