मुंबई नगरी टीम
मुंबई : परतीच्या पावसाने राज्यात चांगलाच धुमाकुळ घातला असून शेतकऱ्यांना याचा फार मोठा फटका बसला आहे. उभ्या पिकांचे नुकसान झाले, संसार उघड्यावर पडल्याने शेतकरी पुरताच हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.तर असे न केल्यास लोकांचा ठाकरे नावावरील विश्वास उडेल, असा सल्लाही मनसेने दिला आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विटरच्या माध्यमांतून मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. “मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो, पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल ऑनलाईन बघता येणार नाही, थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत दया. अन्यथा लोकांचा “ठाकरे” नावावरील विश्वास उडेल, असे बाळा नांदगावरकर यांनी म्हटले आहे. गेले काही दिवस राज्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस झाला. कापणीला आलेली पिके डोळ्यादेखत आडवी झाली. यामुळे हतबल झालेला शेतकरी शासनाकडून मदत मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली पाहिजे, अशी अपेक्षा मनसेने व्यक्त केली आहे.
दरम्यान, कोरोना काळात शक्यतो मुख्यमंत्री घरूनच सर्व कारभार पाहत आहेत. यावरून विरोधकांनी त्यांना वारंवार लक्ष्य देखील केले. पंरतु आपण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घरी राहून देखील राज्याच्या कानाकोपऱ्याचा आढावा घेत आहोत. त्यामुळे लॉकडाउनचे नियम मोडण्याची काय गरज, असा प्रतिप्रश्न मुख्यमंत्र्यांनी टीकाकारांना केला होता. सध्या उद्भवलेल्या बिकट परिस्थितीने शेतकऱ्यांची दैना केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता तरी घराबाहेर पडावे, असे आवाहन करत मनसेने “ठाकरे” ब्रँडची आठवण करून दिली आहे. याला मुख्यमंत्री आता कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.