मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जबाबदारीने काम करतायत : शरद पवार

मुंबई नगरी टीम

तुळजापूर : कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात राहूनच राज्याचा कारभार सांभाळत असून विरोधकांना ही बाब काहीशी पटत नाही.त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर विरोधक सातत्याने टीका करत आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारला असता त्यांनी उद्धव ठाकरेंची पाठराखण केली आहे. तसेच मुख्यमंत्री जबाबदारीने काम करत असल्याचे देखील शरद पवार म्हणाले. आज तुळजापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कोरोना सारख्या संकटात महत्त्वाच्या व्यक्तींनी मुंबईत एका ठिकाणी राहून नियोजन करणे आवश्यक असते. तसेच प्रत्येक जिल्ह्याशी संपर्क साधून उपाययोजनांचा आढावा घ्यायला लागतो. त्यामुळे आम्हीच मुख्यमंत्र्यांना एका ठिकाणी राहण्याची विनंती केली आणि आढावा घ्यायला सांगितला. इतर मंत्री हे फिल्डवर होते. सगळ्यांनीच फिल्डवर जाणे आवश्यक नसून काहींनी मुंबई राहून निर्णय घेण्याची गरज असते. आमच्याशी चर्चा झाल्याप्रमाणे मुख्यमंत्री जबाबदारीने काम करत आहेत, असे स्पष्टीकरण देत शरद पवार यांनी विरोधकांच्या टीकेला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, राजकीय वर्तुळात चर्चिल्या जाणाऱ्या आणखी एका विषयावर शरद पवार यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आला. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे. या संदर्भात राष्ट्रवादीकडून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. एकनाथ खडसे पक्षात प्रवेश करणार का?, असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला असता यावर ते म्हणाले, एकनाथ खडसे हे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते होते, अर्थमंत्री होते. आम्हाला शिव्या घालत होते. पण त्यांचे कर्तृत्व, काम आणि खानदेशातील स्थान याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे शरद पवार म्हणाले. तसेच एकनाथ खडसे यांना आपली नोंद घेतली जात नाही असे वाटत असेल, तर अशावेळी जिथे नोंद घेतली जाते तिथे माणूस जाण्याचा विचार करतो. त्यामुळे एखाद्या पक्षाबद्दल विश्वास वाटत असला त्याला आम्ही काय करणार?, असा प्रतिप्रश्न शरद पवारांनी केला. तर एकनाथ खडसे यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न असल्याचेही त्यांनी म्हटले .

Previous articleकेवळ काही तरी घोषणा करणार नाही; तर प्रत्यक्ष मदत करणार : मुख्यमंत्री
Next articleहे तुमचे सरकार,शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्र्यांची ग्वाही