मुंबई नगरी टीम
सोलापूर : राज्यात अतिवृष्टी झालेल्या भागांतील नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्वतः बांधावर जाऊन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. हे शेतकऱ्यांचे सरकार असून तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच नेमकी किती मदत करायची याची माहिती सध्या गोळा करत आहे. सर्व माहिती उपलब्ध झाल्यावर शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली जाईल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्तांना दिले. आज सोलापूर दौऱ्यावर असताना माध्यमांशी ते बोलत होते.
“नेमकी मदत किती करावी, काय करावी ही माहिती आम्ही गोळा करत आहोत. शेतकऱ्यांना पुन्हा एकद सांगेन तुम्हाला कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. नाराज करणार नाही. हे शेतकऱ्यांचे सर्व जनतेचे सरकार आहे. त्यामुळे जे शक्य होईल ती मदत करू”, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच किती मदत करायची ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर तात्काळ मदत जाहीर करू. येत्या तीन-चार दिवसांतील दौऱ्यानंतर किती मदत करायची याचा साधारण अंदाज येईल. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधत शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, असे म्हणत विरोधकांनी ठाकरे सरकारकडे बोट केले. आपल्याला राजकारण करायचे नाही. पंरतु केंद्राकडे राज्याचे जे देणे बाकी आहे ते त्यांनी आम्हाला परत द्यावे. ती मदत आली तर केंद्र सरकारकडे आम्हाला हात पसरावे लागणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसह केंद्र सरकारलाही चिमटा काढला आहे.
नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगवी, अक्कलकोट येथील पीडित शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच ११ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यावेळी धनादेश देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आलाआपले सरकार सत्तेत आल्यापासून अनेक संकटाना तोंड देत असून त्यावर आपण मात करू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दाखवला. ना भूतो न भविष्यती अशी संकटे येत आहेत. आधी कोरोनाचे संकट आले. आता अतिवृष्टीचे संकट आले. संकटाचे डोंगर उभे राहत आहेत. पण संकटाचे हे डोंगर नक्की पार करू, शेतकऱ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त करताना एक इशारा देखील दिला आहे. अतिवृष्टी होऊ नये ही प्राथर्ना करत आहे. पंचनामे सुरू आहेत. माहिती घेत असून त्याचा अभ्यास करत बसणार नाही. पाण्याचा अनपेक्षित लोंढा आला. ७० वर्षांनंतर प्रचंड पाणी आले. त्यामुळे पूर रेषा लक्षात ठेवून पुनर्वसन करू. अतिवृष्टीचा इशारा अजून कायम असून गाफील राहू नका, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.