मुंबई नगरी टीम
सोलापूर : राज्य झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरीता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यातील विविध भागांचा दौरा करीत आहे. मात्र यावरून सध्या जोरदार राजकारण रंगले आहे.फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रत्युतर दिले आहे.बिहारमध्ये निवडणुकीचा प्रचार करण्यापेक्षा स्वत:च्या राज्यासाठी आधी काम करा, असा टोला मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना लगावला आहे.
परतीच्या पावसामुळे पूरसंकटात राज्यातील बळीराजा कोलमडून पडलेला आहे.या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूरच्या दौ-यावर आहेत.राष्ट्रवादीचे अध्यक्ष मराठवाडा दौरा करीत आहेत.तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी बारामतीचा दौरा केला.मात्र या दौ-यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीवरून राजकारण चांगलेच तापले पहायला मिळाले आहे. बारामतीच्या दौ-यात फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.भाजपने फडणवीस यांच्यावर बिहारच्या निवडणुकीची सोपवली आहे. फडणवीस हे बिहारचे प्रभारी म्हणून ते काम पाहत आहेत.हा धागा पकडत मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे.बिहारमध्ये निवडणुकीचा प्रचार करण्यापेक्षा स्वत:च्या राज्यासाठी आधी काम करा,असा खोचक सल्ला ठाकरे यांनी फडणवीसांना दिला आहे.
केंद्र आणि राज्य सरकार पुरग्रस्तांसाठी काय मदत करेल याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही ज्या राज्याचे आहात त्यासाठी आधी काम करा. बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा आपल्या राज्यात लक्ष घाला.तुम्ही अगोदर राज्याचे विरोधी पक्षनेते आहात आणि महाराष्ट्रातील एक जबाबदार नेते आहात,याचे भान राहू द्या, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला आहे.फडणवीस सध्या नियमितपणे बिहारला जात आहेत. त्या प्रमाणे त्यांनी थोडं दिल्लीतही जावे.ते दिल्लीत गेले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील घराबाहेर पडतील,असा टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला. केंद्राच्या मदतीची वाट पाहण्यापेक्षा राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी विरोधक करत आहेत.त्यामुळे केंद्राकडून मदत मागण्यामध्ये गैर काय,असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले आहे. तसेच केंद्र सरकार हे परदेशातील नव्हे तर ते देशाचे सरकार आहे. राज्यांची काळजी घेणे केंद्राचे कर्तव्य आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
गरज असताना केंद्राकडे मदत मागितली तर गैर काय ? पंतप्रधानांनीही स्वतः फोन करून मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. केंद्र सरकार देशातील सरकार आहे,परदेशातील नाही. राज्यांना मदत करणे हे केंद्राचे कर्तव्य आहे. राज्यातील विरोधक केवळ पक्षीय राजकारणाचा विचार करत असतील. मात्र, देशाच्या सरकारला मदत करताना पक्षपात करून चालत नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले. तसेच देवेंद्र फडणवीस बिहारला जातात तर त्यांनी दिल्लीला जावे पंतप्रधान घराबाहेर पडतील. बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा तुम्ही ज्या राज्यात आहात जिथे अतिवृष्टीचे संकट आले आहे, तिथे एकत्र येऊन केंद्राकडे मदत मागितली पाहिजे, असा सणसणीत टोला मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांना लागवला आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. शेतकऱ्यांनो अजिबात काळजी, चिंता करु नका, तुम्हाला जे जे आवश्यक आहे, ते ते केल्याशिवाय तुमचे सरकार शांत राहणार नाही. संकट पूर्ण टळलेले नाही. हा परतीचा पाऊस किती फटका देईल याचा अंदाज आलेला आहे. पंचनामे झालेत, पूर्ण आढावा तातडीने घेऊन, प्रत्यक्ष मदत दिली जाईल. तूर्तास जे बांधव, माता मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला दिलासा देण्यास सुरुवात केली आहे. कोणी काळजी करण्याचे कारण नाही, घाबरण्याचे कारण नाही. सावध राहा, प्राणहानी, जीवितहानी होता कामा नये, तशा सूचना यंत्रणांना दिल्या आहेत. आढावा घेऊन प्रत्यक्ष जी मदत आहे ती दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहे.