मुंबई नगरी टीम
मुंबई : एकीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होत असतानाच त्यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित राहिल्याने विविध वाहिन्यांवर अजित पवार नाराज अशा बातम्या झळकल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांचे कान टोचतानाच नाराजी व्यक्त केली तर खडसे यांच्या पक्षप्रवेशाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले आहे.
माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत आज राष्ट्रवादीत प्रवेश करत राजकीय सीमोल्लंघन केले.एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात स्वागत केले. मात्र, दुसरीकडे खडसे यांच्या प्रवेशावर अजित पवार नाराज असल्याचे वृत्त काही वृत्त वाहिन्यांवर झळकत होते. या सुरू असलेल्या चर्चेला खुद्द शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्णविराम दिला. खडसेच्या प्रवेशवेळी आपल्या भाषणात शरद पवार यांनी याबाबत नाराजी व्यक्त करीत असे वृत्त देणा-या माध्यमांचे कान टोचले.खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार असल्याची तर मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांचे खातेबदल केले जाणार असल्याची चर्चाही सुरू होती. या चर्चेलाही पवार यांनी पूर्णविराम दिला.
गेल्या काही दिवसांपासून माध्यमे खडसे यांच्या प्रवेशाच्या बातम्या चालवत होते. आज तर काही तरी वेगळंच.अजितदादा नाराज आहेत.अरे कशाला नाराज आहेत. असे आहे की, कोरोनाच्या संकटात प्रत्येकाची काळजी घ्यावी लागते. काळजी घेण्याच्या सूचना मी प्रत्येकाला दिल्या आहेत. जितेंद्र आव्हाड व्हेटिंलेटरवर होते. राज्य सरकारमध्ये काम करणाऱ्या अनेक मंत्र्यांना कोरोना झाला. त्यामुळे काळजी घेत आहोत.खबरदारी म्हणून काही सहकारी दिसले नाही म्हणून लगेच काहीतरी गडबड झाली. काहीही गडबड झालेली नाही असे पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले.शरद पवार यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे स्वागत केले.राज्याचे ज्येष्ठ नेते, माननीय श्री. एकनाथरावजी खडसे साहेबांचे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मनापासून स्वागत करतो.माननीय खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ,ऊर्जा मिळाली आहे.खानदेशसह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल. माननीय खडसेसाहेब, माननीय रोहिणीताई खडसे, त्यांच्यासोबत पक्षप्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी,समस्त कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी पक्षांमध्ये हार्दिक स्वागत. पक्षात आपल्या ज्येष्ठत्वाचा, अनुभवाचा निश्चित सन्मान होईल, असा विश्वास देतो. पुढील कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा…असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.