मुंबई नगरी टीम
मुंबई : भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणाऱ्या एकनाथ खडसे यांना महाविकास आघाडीत नेमके कोणते पद दिले जाईल याची चर्चा आता रंगली आहे. तर खडसेंना महाविकास आघाडीत काय स्थान असेल यावर केवळ शरद पवार निर्णय घेऊ शकतील, असे शिवसेना खासदार संजय यांनी म्हटले. तसेच खडसेंच्या कृषी मंत्री पदासाठी कोणताही प्रस्ताव शिवसेनेला आला नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
एकनाथ खडसे यांच्यासारखा ज्येष्ठ अभ्यासू नेता आता महाविकास आघाडीमध्ये आला आहे. त्यामुळे खडसेंना त्यांच्या राजकीय उंचीनुसार एक मोठी जबाबदारी या सरकारमध्ये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळात फेरबदल करून शिवसेनेच्या कोट्यातील कृषीमंत्री पद खडसेंना दिले जाणार अशी चर्चा आहे. यावर प्रश्न विचारला असता, कृषीमंत्री पद हे शिवसेनेकडे असून सध्या शिवसेनेकडून शेतकऱ्यांविषयी चांगले निर्णय घेतले जात आहेत. अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव आला असल्याचे माझ्या माहितीत नाही, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे. दरम्यान, कृषी मंत्री पदासाठी खडसे आग्रही असल्याचे बोलले जात आहे. तर कृषी मंत्री पद हे दादा भुसे यांच्याकडे असून आपण ते सोडण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पक्षश्रेष्टी जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असल्याचे दादा भुसे यांनी म्हटले. त्यामुळे खडसेंसाठी शिवसेना आपले मंत्रिपद सोडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर बोलताना संजय राऊत यांनी राजकारणात असे होतच असल्याचे म्हटले आहे. राजकारणात मागचे विसून पुढे जायचे असते. भाजप मोठा पक्ष आहे. खडसेंवर जो अन्याय झाला तो त्यांनी वरिष्ठांना कळवला आहे. राजकारणात गळती लागते. शिवसेना, राष्ट्रवादीतील अनेक नेते पक्ष सोडून गेले आहेत. त्यामुळे असे होत राहते, असे संजय राऊत यांनी म्हटले. भाजपला गळती लागण्याची ही सुरुवात आहे का, यावर बोलताना दसरा मेळाव्यावर लक्ष ठेवा, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले. भाजपमध्ये अस्वस्था आहे. हे सरकार पाच वर्षे चालणार आहे. त्यामुळे कोणी कितीही फडफडले तरी काहीही होणार नाही. अनेक लोक आमच्या संपर्कात असल्याचा दावा देखील यावेळी संजय राऊतांनी केला. नाराजांना महाविकास आघाडीत स्थान आहे का?, असे विचारले असता, महाविकास आघाडीचे दरवाजे खुलेच आहेत. दरवाजे आम्ही खुले ठेवले म्हणून तीनपक्ष एकत्र आले अशी कबुलीही त्यांनी यावेळी दिली.