नाथाभाऊ काय चीज आहे ते आता दाखवून देऊ : शरद पवार

मुंबई नगरी टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या राजकारणातील कामगिरीचे कौतुक करत त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढेल,यात माझ्या मनात काहीही शंका नाही,असे म्हटले. एकदा शब्द दिला म्हणजे,नाथाभाऊ मागे हटत नाहीत.त्यामुळे आता खऱ्या अर्थाने नाथाभाऊ काय चीज आहे हे दाखवून देऊ,असा इशारा पवारांनी दिला आहे.

एकनाथ खडसे यांचे पक्षात स्वागत करताना केलेल्या भाषणात म्हटले की, आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा दिवस आहे. खान्देश हा संपूर्ण परिसर गांधी-नेहरू विचारांचा होता. एका काळ असा आला की काँग्रेसला उतरती कळा लागली,त्याकाळात भाजपची नवी पिढी तयार झाली. ही पिढी घडवण्याचे काम नाथाभाऊंनी केले. त्यांनी जिल्हा परिषद, खासदार, नगरपरिषद, पंचायत समित्या आणल्या. त्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात या जिल्ह्यातील कार्यकर्ता यशस्वी झाला ते केवळ नाथाभाऊंमुळे. इतिहासाचा हा पहिला टप्पा संपला आहे. आता दुसरा टप्पा सुरू संपतोय, असे शरद पवार म्हणाले. आता यानंतरच्या काळामध्ये हा जिल्हा पुन्हा एकदा राष्ट्रवादी विचाराने चालणार, असे चित्र उभे करण्यासाठी आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन प्रयत्न करणार, असा शब्द यावेळी खडसेंनी आपल्याला दिला असल्याचे पवारांनी सांगितले.

खडसेंचा अनुभव पक्षासाठी अनुभवाचा ठरेल. नाथाभाऊ राष्ट्र्वादीत आल्याने पक्षाला गती येईल. नाथाभाऊंनी खान्देशात पक्ष वाढवण्याचा शब्द दिला आहे. ते दिलेला शब्द पूर्ण करतात. त्यावरून मागे हटत नाहीत. ही त्यांची खासियत आहे. आता कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यावर आपण जळगावात जाणार असून नाथाभाऊ काय चीज आहे हे महाराष्ट्राला दाखवून देऊ, असे शरद पवार म्हणाले. दरम्यान, एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत कोणतं पद मिळेल, अशी चर्चा असताना शरद पवारांनी त्यावरही भाष्य केले. नाथाभाऊंची पक्षातील अनेकांशी चर्चा झाली. पण त्यांनी एका शब्दाने आपली ही अपेक्षा आहे असे कधीही सांगितले नाही. कोणतेही बदल होणार नाहीत. आहेत ते सर्व तसेच राहतील. महाराष्ट्राच्य जनतेसाठी आपण एकत्र येऊन काम करण्याची अपेक्षा असल्याचे खडसेंनी सांगितले, असे शरद पवार म्हणाले.

Previous articleएकनाथ खडसेंचे महाविकास आघाडीत काय स्थान असेल हे शरद पवार ठरवतील : संजय राऊत
Next articleराष्ट्रवादी नाथाभाऊंचे समाधान लिमलेटची गोळी देऊन करणार की कॅडबरी ? भाजपचा टोला