मुंबई नगरी टीम
मुंबई : एकनाथ खडसे यांनी आज जाहीररीत्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.काही लोक लिमलेटची गोळी मिळाली तरी समाधानी होतात.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेंना लेमलेटची गोळी देतात की कॅडबरी हे पाहावे लागले,असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लागावला आहे.तसेच एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडण्याची गरज नव्हती,अशी भावना चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर माध्यमांनी भाजपची प्रतिक्रिया जाणून घेतली.यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, नाथाभाऊ यांच्यावर जो अन्याय झाला त्यावर अनेकदा त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांना पक्षाने खूप काही दिले. त्यामुळे त्यांच्यावर जो अन्याय झाला त्यावर काहीतरी तोडगा निघाला असता. आता जयंत पाटील काय देतात हे बघूया, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच आजचा २ वाजताच पक्षप्रवेश ४ वाजेपर्यंत का लांबला, याचे उत्तर जयंत पाटील यांनी द्यावे.
नाथाभाऊंना काय द्यायचे हे तुम्ही अजून ठरवलेले नाही.तुमचे समाधान होईल,असे आश्वासन दिल्यानंतर नाथाभाऊ नरिमन पॉईंटच्या घरून बाहेर पडले.आता समाधान म्हणजे लिमलेटची गोळीही असते आणि कॅडबरीही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना काय देणार हे पाहावे लागेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तर जे मिळाले त्यावर नाथाभाऊ समाधानी होतील का? की काही पर्यायच नसल्याने मिळेल ते स्वीकारतील?, असे प्रश्न उपस्थित करत चंद्रकांत पाटलांनी खडसेंना चिमटा काढला आहे. दरम्यान, प्रत्येकवेळी तुम्ही आरोप करायचा आणि देवेंद्र फडणवीस यांनी गप्प बसायचे हे योग्य नाही. भाजपमध्ये होणारे निर्णय हे सामूहिक असतात. एकट्या फडणवीस यांना दोष देणे योग्य नाही, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी नाथाभाऊंना सुनावले.