मुंबई नगरी टीम
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर भाजप नेते चांगलेच खवळले असल्याचे दिसत आहे. भाजप खासदार नारायण राणे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल चढवला. तर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. खुर्चीसाठी हिंदुत्वाला आपल्या सोयीनुसार चालवणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. तर राज्यप्रमुख असूनही आपल्या भाषणात एकही सेकंद शेतकऱ्यांसाठी दिला नाही, मग त्या पदाचा काय उपयोग?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
सोयीचे हिंदुत्व या आशयाखाली चंद्रकांत पाटील यांनी टीका करत म्हटले की, “काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात देशाच्या सर्वोच्चपदी असणाऱ्या लोकांबद्दल अगदी अर्वाच्य भाषेचा उपयोग केला. तुम्ही राज्यप्रमुख आहात, याचा कदाचित तुम्हाला विसर पडला असल्याची प्रचिती काल आली. तुम्ही काल भाषणात पुन्हा एकदा तुमच्या तथाकथित हिंदुत्वाच्या नावाने गाजावाजा केला. मात्र, सत्तेच्या लालसेपोटी सोयीनुसार तुम्ही हिंदुत्वाची व्याख्या बदलत आहात, हे प्रकर्षणाने जाणवत आहे. बाळासाहेबांच्या नावाने अजून किती दिवस पोळ्या भाजणार? खुर्चीसाठी त्यांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या शिकवणीचे पालन करणे तुम्ही विसरला आहात”, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला.
“ज्यांच्या स्मारकाठिकाणी तुमचा कालचा कार्यक्रम चालला होता, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्वदेखील तुमच्या पचनी पडले नाही. संरसंघचालक मोहन भागवत यांच्याच मार्गाने आम्ही चालत आहोत. सरसंघचालकांनी कालच्या भाषणात एक वक्तव्य केले, ‘हिंदू, हिंदुत्व, हिंदुराष्ट्र इसको लेकर भ्रम पैदा करने वाले लोग है’, हे मुळात तुमच्यासाठी होते. हिंदुत्वाचा वापर करुन आपली खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी तुमचा हा सगळा आटापिटा सुरू आहे. तुमच्याकडून आम्हाला हिंदुत्व शिकून घेण्याची गरज नाही. कारण तुमचे हिंदुत्व हे सोयीप्रमाणे बदलत असते.
मी कुटुंबप्रमुख आहे, असे काल तुम्ही म्हणालात. याशिवाय काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी दौऱ्यावेळी हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, असं वक्तव्य तुम्ही केले होते. मग जे कुटुंब बळीराजाच्या जीवावर चालते त्यांच्यावर एकही शब्द न बोलता काल जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या सद्यपरिस्थितीचा उल्लेख करणे टाळले. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरही चिडीचूप बसलात. केवळ आपलेच ढोल बडविण्यात तुम्ही समाधान मानले. एकंदरीत कालचे मुख्यमंत्र्यांचे भाषण हे अभ्यासशून्य आणि सूड भावनेने प्रेरित होते. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, ११ कोटींचे कुटुंब तुम्हाला सांभाळायचे आहे केवळ भाषणबाजी करुन काहीही होणार नाही,अशी टीका यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली.