मराठा आरक्षण : आम्ही वेट अँण्ड वॉचच्या भूमिकेत ;संभाजीराजेंचा सरकारला इशारा

मुंबई नगरी टीम

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत सरकारला जाब विचारला आहे.मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने घातलेली स्थगिती उठवण्यासाठी सरकार काय नियोजन करत आहे,अशी विचारणा यावेळी संभाजीराजे भोसले यांनी केली.तर आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असून आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीय असा इशारा संभाजीराजे भोसले यांनी दिला आहे. आज मराठा क्रांती मोर्चा महामुंबईच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आक्रोश आंदोलनात त्यांनी सभागत घेतला होता.यावेळी ते बोलत होते.

यावर बोलताना संभाजीराजे भोसले म्हणाले, “आज आपली लढाई सर्वोच्च न्यायालयात आहे.  सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला, तो आपण मान्यच करावा लागतो आणि आम्ही सन्मान सुद्धा करतो. त्याबद्दल काही दुमत नाही. पण माझे सरकारला हेच म्हणणे आहे की,आम्ही किती दिवस शांत बसायचे. किती दिवस मोर्चे काढायचे, किती दिवस बैठक घ्यायच्या. सर्वोच्च न्यायालयात आता आरक्षणाला स्थगिती आहे. ती स्थगिती उठवण्यासाठी उद्या न्यायालयात तारीख आहे. माझे सरकारला हेच आवाहन आहे की, बाकीची कामे सगळी बंद करा, बहुजन समाजाला न्याय देण्याची जबाबदारी सरकारची आहे. केवळ कारण सांगून चालणार नाही सरकारने भूमिका घेणे गरजेचे आहे”, असे संभाजीराजे यांनी म्हटले.

“उद्या सुनावणी आहे त्यासाठी तुम्ही काय तयारी केली आहे? आम्हाला सुद्धा माहित पाहिजे. कारण बऱ्याच शंका निर्माण होतात. याचे कारण म्हणजे, नोकर भरतीचा विषय आहे. २७ जागांसाठी २०० लोकांचे नुकसान केले. मराठा समाजामुळे बाकीच्या समाजाचे नुकसान झाले, असा वेगळा संदेश पाठवला जात आहे, हे चुकीचे आहे. एमपीएसी २०१९-२० च्या ४२० जागा आहे त्या का भरल्या नाहीत अजून, असा माझा सरकारला प्रश्न आहे. यामध्ये १२७ मराठ्यांच्या जागा आहेत. आम्ही केवळ एकाच नव्हे तर सर्व समाजासाठी आग्रही आहोत. जुन्या नोकर भरती अजूनही प्रलंबित आहेत. मराठा समाजात आणि इतरांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी नवीन नोकर भरती काढली जात आहे”, असा आरोपही संभाजीराजेंनी केला. तर कोण आजी आणि कोण माजी मुख्यमंत्री याचे आम्हाला घेणे देणे नाही. आम्हाला आरक्षण हे हक्काचे मिळाले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्याचे काम हे आताच्या सरकारचेच आहे. त्यामुळे आम्हाला काय देणार, तुमचे नियोजन काय हे सांगा. आम्हाला गृहीत धरू नका, असा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे.

Previous articleबाळासाहेबांच्या नावाने अजून किती दिवस पोळ्या भाजणार ?
Next articleराज्यपाल नियुक्त सदस्यांच्या १२ जागांसाठी उद्याचा मुहूर्त ? या नावांची चर्चा