मुंबई नगरी टीम
मुंबई : विषय खूप आहेत पण सरकारने निर्णय घ्यायला हवेत. आपल्याकडे प्रश्नांची कमतरता नाही, निर्णयांची कमतरता आहे आणि ते का घेतले जात नाहीत ? सरकार का कुंथत आहे ?, असा सवाल मनसे अध्यक्ष राजे ठाकर यांनी केला. कोरोनाचे संकट समोर असताना नागरिकांना वाढीव वीज बिलाचा मनस्ताप देखील सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली.राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनसेच्या शिष्टमंडळाने वाढीव वीज बिलासंदर्भात राज्यपालांना निवेदन दिले. यावेळी त्यांनी राज्य सरकाराच्या कारभारावर देखील ताशेरे ओढले आहेत.राज्यपाल भेटीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
राज ठाकरे यांना वाढीव वीज बिलासंदर्भात राज्यपालांशी चर्चा केली.तर वाढीव वीज बिलाव्यतिरिक्त इतरही प्रश्न आहेत, यावर विचारण्यात आले असता ते म्हणाले, विषय खूप आहेत पण सरकारने निर्णय घ्यायला हवेत. आपल्याकडे प्रश्नांची कमतरता नाही, निर्णयांची कमतरता आहे, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. विद्यार्थ्यांचे अकरावीचे प्रवेश अडकले आहेत, रेल्वे सुरू होत नाही, रेस्तरॉं सूरू झालेत पण मंदिरे बंद आहेत. हा धरसोडपणा काय सुरू आहे, हे समजत नाही. त्यामुळे सरकराने नीट विचार करून लोकांना एकदाच काय ते स्पष्ट करावे, अशी भूमिका यावेळी राज ठाकरे यांनी मांडली.
येत असलेल्या वाढीव वीज बिलाच्या संदर्भात राज्यपालांशी चर्चा केली. गेली अनेक दिवस माझा पक्ष, कार्यकर्ते या प्रकरणी आंदोलन करत आहेत. याप्रकरणी अदानी, बीएसटीचे लोक भेटून गेले. वीज बिल आम्ही कमी करु शकतो पण एमईआरसीने आम्हाला मान्यता दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. आमच्या पक्षाचे एक शिष्टमंडळ एमईआरसीच्या लोकांना भेटून आले. त्यांच्याकडून आम्हाला लेखी स्वरुपातील एक पत्र आले. कंपन्या वीज बिले कमी करण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात. आमचे त्यांच्यावर दडपण नाही असे एमईआरसीचे म्हणणे आहे. म्हणजे एका बाजूला या कंपन्या एमईआरसीचे नाव सांगत आहेत, तर दुसरीकडे एमईआरसी आमचे काही दडपण नाही ते त्यांचे निर्णय करू शकतात, असे म्हणत आहेत, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
तसेच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी देखील आपले बोलणे झाले. लवकरात लवकर निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले, पण अजून निर्णय झालेला नाही.राज्यपालांशी बोलल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्याशी बोलून घ्या,असे सांगितले. त्यामुळे शरद पवार यांच्याशी देखील बोलणार आहे.हा विषय राज्य सरकारला माहिती आहे तर मग प्रकरण कशात अडकले आहे कळत नाही, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. याचा निर्णय तात्काळ घ्यायला पाहिजे. राज्यपाल यांना निवदेन दिले आहे. शरद पवार त्यांच्याशी फोन किंवा प्रत्यक्षात जाऊन चर्चा करणार. वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार, असेही ते म्हणाले. दरम्यान, राज ठाकरे यांनी आज प्रथमच राज्यपाल कोश्यारी यांची राजभवनात जाऊन भेट घेतली, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. वाढीव वीज बिलांचा प्रश्न मनसेने या आधीपासूनच लावून धरला आहे. त्यामुळे आता राज्य सरकार यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.