मुंबई नगरी टीम
मुंबई : नागपूर मध्ये होणारे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी येत्या ७ डिसेंबरपासून मुंबईत घेण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला असला तरी कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता मुंबईत होणारे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
गेल्या आठ महिन्यापासून राज्यावर असलेले कोरोनाचे संकट निवळू लागल्याने राज्य सरकारने राज्यातील टाळेबंदीत मोठ्या प्रमाणात शिथीलता दिली आहे.आज पासून मंदिरे आणि सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे उघडण्यात आली आहेत.दिवाळीपूर्वी राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे दिवाळी राज्यातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाल्याचे चित्र आहे.दिवाळी,भाऊबीज या सणांमुळे लोकांच्या गाठीभेटी आणि गर्दीशी संबंध आल्याने भविष्यात रूग्णांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.याच पार्श्वभूमीवर मुंबईत होणारे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा विचार सुरू केला असल्याची माहिती एका ज्येष्ठ मंत्र्याने दिली आहे.राज्यात गणपतीनंतर कोरोनाच्या रूग्ण संख्येत वाढ झाली होती.त्यामुळे दिवाळी मध्ये लोकांच्या वाढत्या संपर्कामुळे रूग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून राज्य सरकारने या दिवसांतील आकडेवारी तपासण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या ७ डिसेंबरपासून सुरू होणा-या अधिवेशनाच्या कामकाजाचा कालावधी ठरविण्यासाठी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कामकाज सल्लागार समितीची पुन्हा बैठक होणार असून, या होणा-या बैठकित राज्यातील कोरोना रूग्णांच्या आकडेवारीचा विचार करून अधिवेशन ७ डिसेंबरला घ्यायचे की, पुढे ढकलायचे याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.मुंबईत झालेल्या पावसाळी अधिवेशानापूर्वी विधीमंडळातील कर्मचारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आमदार, मंत्री आणि त्यांच्या अधिकारी वर्गांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.या चाचणीमध्ये ३१ आमदार,मंत्रालय आणि विधिमंडळातील कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.हिवाळी अधिवेशनापूर्वी तीच प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये घेतले तरी फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्पीय होणार असल्याने पुन्हा दोन महिन्यानंतर कोरोनाच्या चाचणी प्रक्रियेमधून सर्वांना जावे लागणार आहे.त्यामुळे कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढल्यास संभाव्य धोका टाळण्यासाठी हिवाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन एकत्रही घेऊ शकते, अशी शक्यता एका मंत्राने व्यक्त केली.