आता महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता “कृष्णकुंज” शिवाजी पार्क

मुंबई नगरी टीम

मुंबई : गेल्या महिनाभरापासून अनेक संघटना आपल्या विविध मागण्यांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर दाखल होत आहेत.डबेवाले, कोळी बांधव,जिम मालक,पुजारी, बॅण्ड पथक यांसह इतर अनेक संघटनांनी आतापर्यंत राज ठाकरेंची भेट घेतली आहे.या पार्श्वभूमीवर मनसेने महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत कृष्णकुंज हा मंत्रालयाचा नवीन पत्ता असल्याचे म्हणत सरकारवर बोचरी टीका केली आहे.

“समस्या अनेक उपाय एक, महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता श्री राजसाहेब ठाकरे कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई २८”,असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे. कोरानाच्या पार्श्वभूमीवर सरकारने शिथिलतेच्या प्रक्रियेअंतर्गत अनेक उद्योगधंद्यांना काही अंशी सूट देण्यात आला होती. परंतु काही गोष्टींबाबत सरकारने निर्णय जाहीर केला नव्हता. यामध्ये सरसकट सर्वांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी ही मागणी मनसेने लावून धरली होती. त्यानंतर महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. तसेच मुंबईच्या डबेवाल्यांना देखील लोकलने प्रवास करण्याची परवानगी सरकारने दिली.

आतापर्यंत बेस्ट कर्मचारी, केबलचालक, कोळी बांधव, मूर्तीकार, डबेवाले, जिम चालक-मालक, कोळी महिला, वीजबिल ग्राहक, पुजारी,डॉक्टर,पालक-विद्यार्थी, कोचिंग क्लासेस शिक्षक आदिंच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची भेट घेत आपल्या समस्या त्यांच्यापुढे मांडल्या. तर नुकतीच यंदाच्या कार्तिकी यात्रेसाठी वारकरी संप्रदाय तसेच आपली विविध कामे सुरू करण्यासाठी बॅण्ड पथकांनी त्यांची भेट घेत आपली भूमिका मांडली होती.

Previous articleमुंबईत होणा-या हिवाळी अधिवेशनावर कोरोनाचे संकट; अधिवेशन पुढे ढकलणार ?
Next articleभाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचे शक्ती प्रदर्शन;शरद पवारांचा येत्या २० तारखेपासून दौरा