भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचे शक्ती प्रदर्शन;शरद पवारांचा येत्या २० तारखेपासून दौरा

मुंबई नगरी टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे येत्या २० आणि २१ नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर शरद पवारांचा उत्तर महाराष्ट्रात हा पहिलाच दौरा असणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसह खडसे समर्थकांकडून देखील जोरदार तयारी केली जात आहे.

शरद पवार हे धुळ्यासह नंदुरबारचा दौरा करणार आहेत. यावेळी ते इथल्या स्थानिक नेत्यांशी संवाद साधणार आहेत. उत्तर महाराष्ट्रात पक्ष विस्तारासाठी शरद पवारांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे या दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे यांचा उत्तर महाराष्ट्रात मोठा दबदबा आहे. त्यांचा समर्थकांचा वर्ग देखील मोठा आहे. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तर आता शरद पवार यांच्या दौऱ्यानिमित्त आणखी पक्षप्रवेश होणार का? अशी चर्चाही रंगली आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधले. यावेळी त्यांनी जळगावसह उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करू, असा शब्द दिला होता.त्यानंतर त्यांनी भाजपविरोधात चांगलेच दंड थोपटले आहेत. काही दिवसांपूर्वीच रावेर तालुक्यातील ६ भाजप पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे आणि कन्या रोहिणी खडसेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर दीडशेहून अधिक कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला होता. शिवाय भाजपचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावाही खडसेंनी केला होता. यामुळे आता एकंदर शरद पवार यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous articleआता महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता “कृष्णकुंज” शिवाजी पार्क
Next articleशिवसेनेला मुख्यमंत्रीपदाबाबत शब्दच दिला नव्हता ; भाजप नेत्याचा दावा