शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाबाबत शब्दच दिला नव्हता ; भाजप नेत्याचा दावा

मुंबई नगरी टीम

मुंबई : बिहार विधनासभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणार आहेत. बिहारमध्ये नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील, असा शब्द भाजपने दिला होता.ज्यावरून अनेक तर्कवितर्क काढले जात होते. महाराष्ट्रात देखील यावरून टीका टिप्पण्या होताना दिसत आहेत.या पार्श्वभूमीवर भाजप नेत्याने महत्त्वाचे विधान केले आहे.

भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बिहारच्या निमित्ताने महाराष्ट्रात गतवर्षी घडलेल्या नाट्यमय घडामोडींना पुन्हा उजाळा दिला.बिहारमध्ये भाजपने आधीच जाहीर केले होते.त्यानुसार जेडीयू नेते नितीश कुमार हेच मुख्यमंत्री झाले.भाजपने दिलेला शब्द पाळला.मात्र महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाबाबत कधीच शब्द दिला नव्हता,असे प्रवीण दरेकर म्हणाले.यासह बिहारमध्ये भाजपला दोन उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळाली आहे. याबाबत विचारले असता, भाजपने दोन मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय कोणत्याही दहशतीमुळे घेतलेला नाही. बिहार मोठे राज्य असल्याने दोन उपमुख्यमंत्री नेमण्यात आले आहेत. यात महिलांच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी महिला उपमुख्यमंत्रीही देण्यात आल्या आहेत, असे दरेकर यांनी स्पष्ट केले.

बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्री हे नितीश कुमार होतील, असा शब्द भाजपने दिला होता.मात्र निवडणुकीत भाजपने संयुक्त जनता दलापेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत.त्यामुळे भाजप आपला शब्द पाळणार का ? यावर चर्चा रंगल्या होत्या. यावरून शिवसेना खासदर संजय राऊत यांनी देखील महाराष्ट्रात शब्द न पाळल्यामुळे काय झाले याची आठवण करून देत भाजपला टोला लगावला होता. दरम्यान, यावर आता भाजप नेते सारवासारव करत असून आपण शिवसेनेला असा शब्दच दिला नसल्याचे म्हणत आहेत.

Previous articleभाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचे शक्ती प्रदर्शन;शरद पवारांचा येत्या २० तारखेपासून दौरा
Next articleमंदिरे उघडण्याचे श्रेय घेणा-या भाजप नेत्यांना राष्ट्रवादीने सुनावले