मंदिरे उघडण्याचे श्रेय घेणा-या भाजप नेत्यांना राष्ट्रवादीने सुनावले

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे आजपासून उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र या मुद्द्यावरून आता श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मंदिरे उघडण्यासंदर्भात आम्ही आक्रमक भूमिका घेतल्याने सरकारने हा निर्णय घेतला, असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मंदिरे उघडण्यावरून श्रेय लाटणाऱ्या भाजपला चांगलेच सुनावले आहे.

तब्बल आठ महिन्यांनंतर आज राज्यातील मंदिरे उघडण्यात आली. यावेळी भाजप नेत्यांनी राज्यातील सर्व प्रमुख मंदिराबाहेर एकच जल्लोष केला. कुठे महाआरती, कुठे ढोलताशांचा गजर तर कुठे पेढे वाटून भाजप नेत्यांनी हा आनंद साजरा केला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पावर यांनी भाजपला टोला लगावला आहे. “धार्मिक स्थळं उघडल्याचं श्रेय भाजप पेढे वाटून घेत असल्याचं मला पत्रकारांनी सांगितलं. पण योग्य वेळी हा निर्णय घेणारं सरकार आणि कोरोनाला रोखण्यासाठी सहकार्य करणारी अध्यात्मिक-धार्मिक क्षेत्रातील मंडळी, भाविक व जनतेचा हा विजय आहे. भाजपने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करु नये”, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

तसेच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील हे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, श्रद्धेच्याबाबतीत राजकारण होते तेव्हा ते नक्कीच दुर्दैवी आहे.या श्रेयवादाची आपल्याला कल्पना नाही.मात्र, जी काही मंदिरे उघडली आहेत.त्यानंतर सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करणे, हात धुणे या त्रिसूत्रीचा अवलंब व्हावा.अन्यथा आज जे श्रेय घ्यायला पुढे येतील त्यांच्यावरच हे खापर फुटू नये. श्रेय घेण्यापेक्षा खबरदारी घ्या, असा सल्ला अमोल कोल्हे यांनी दिला आहे.राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी भाजप, वंचित बहुजन आघाडीसह विविध संघटनांनी आंदोलन केले होते.मनसेने देखील यासंदर्भात मागणी केली होती. आज पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे उघण्यात आली आहेत. त्यामुळे आपल्या आंदोलनामुळेच सरकारला हा निर्णय घेण्यास भाग पाडले, असा दावा भाजप नेते करत आहेत.

Previous articleशिवसेनेला मुख्यमंत्रीपदाबाबत शब्दच दिला नव्हता ; भाजप नेत्याचा दावा
Next articleसरकारला एक वर्ष पूर्ण ; पुढची चार वर्षे कशी जातील ते भाजपला कळणारही नाही