सरकारला एक वर्ष पूर्ण ; पुढची चार वर्षे कशी जातील ते भाजपला कळणारही नाही

मुंबई नगरी टीम

अहमदनगर : महाविकास आघाडी सरकार लवकरच पडणार असे अनेक दावे विरोधी पक्षाकडून केले जातात.राष्ट्रवादी काँग्रेसने या दाव्यांना फटकारत भाजपवर निशाणा साधला आहे. आमचे सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. पुढील चार वर्षेही कशी जातील हे भाजपला कळणार नाही, असा चिमटा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काढला आहे. भाऊबीज निमित्त जयंत पाटील अहमदनगरला आले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. मात्र भाजपकडून वारंवार हे सरकार अधिक काळ टिकणार नाही. त्यांच्यातील विसंवादामुळे ते पडेल, अशी टीका केली जाते. यावर प्रश्न विचारला असता जयंत पाटील म्हणाले, शिवजी पार्क येथे शपथ घेऊन आम्हाला एक वर्ष पूर्ण झाले. हे एक वर्ष कसे गेले हे भाजपला कळले नाही. तर उरलेली चार वर्षे देखील कशी जातील हे त्यांना कळणार नाही, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. दरम्यान, गतवर्षी २८ नोव्हेंबरला महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला होता. त्यानुसार महाविकास आघाडी सरकार आता दुसऱ्या वर्षात पदार्पण करणार आहे.

यावेळी जयंत पाटील यांनी भाजपने कोरोना काळात केलेल्या राजकारणावरूनही टीका केली. भाजपचे नेते कोरोनाच्या संकट काळात अत्यंत बेजबाबदारपणे वागले. त्यांचा बेजबाबदारपणा प्रत्येक गोष्टीत दिसून आला. अशा परिस्थितीतही त्यांनी आपल्या पक्षाची पोळी भाजून घेतली, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरून बोलताना ते म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मंदिरे बंद होती. मात्र तरीही जाणीवपूर्वक त्यांनी आंदोलने केली. राज्य सरकारने विचारपूर्वक सर्व गोष्टी सुरू केल्या आहेत. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने धार्मिक स्थळे सुरू केली. त्यामुळे भाजपने राजकारण करण्याची गरज नाही, असेही जयंत पाटील यांनी सुनावले.

Previous articleमंदिरे उघडण्याचे श्रेय घेणा-या भाजप नेत्यांना राष्ट्रवादीने सुनावले
Next articleअनुसूचित जमातीमधील ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार २६ हजारांचे आर्थिक सहाय्य