अमित शाहांनी सांगितले म्हणून मनपा शिवसेनेसाठी सोडली होती; चंद्रकांत पाटलांचा खुलासा

मुंबई नगरी टीम

पुणे : आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच रणशिंग फुंकले आहे. भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत मुंबई महापालिकेवर भाजपचाच भगवा फडकेल, असा विश्वास विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील मुंबई महापालिका भाजपच्याच ताब्यात येणार असल्याचा दावा केला आहे. तर गेल्या वेळेसही आपलाच महापौर बसला असता असे सांगतानाच त्यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

पुण्यात आज पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. आम्ही मुंबई महानगरपालिका भाजपकडे घेणार आहोत. मागच्या वेळी आम्ही ८२ जागा जिंकलो त्यावेळी आमचाच महापौर बसला असता. परंतु अमित शाह यांनी मुंबई महानगरपालिका शिवसेनेसाठी सोडा आपल्याला राज्य चालवायचे आहे, असे सांगितले होते. शिवसेनेचे ८४ आणि आमचे ८२ नगरसेवक निवडून आले होते, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्रीपदावरून बिनसल्यानंतर शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेतला. मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यासंदर्भात कधीच शब्द दिला नव्हता, असा दावा भाजपडून करण्यात आला होता. तर आता मुंबई महापालिकाही आम्ही त्यांच्यासाठीच सोडली असे, चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केल्यानंतर शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दरम्यान,गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवून आपला भगवा फडकवण्याची तयारी भाजप करत आहे. त्यासाठी भाजपडून मिशन मुंबई ची रणनिती देखील आखली जात असल्याची चर्चा आहे. मात्र भाजपने कितीही तयारी केली तरी महापालिकेवर शिवसेनेचीच सत्ता कायम राहील, असे महाविकास आघाडीतील नेत्यांनी ठणकावून सांगितले आहे.

Previous articleआम्ही केवळ निवडणुकीसाठी राजकारण करतो,इतरांसारखे नाही;आदित्य ठाकरेंचा विरोधकांना टोला
Next articleमनसेच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी; कुठून आला फोन ?