आम्ही केवळ निवडणुकीसाठी राजकारण करतो,इतरांसारखे नाही;आदित्य ठाकरेंचा विरोधकांना टोला

मुंबई नगरी टीम

कल्याण : आम्ही केवळ निवडणुकीसाठी राजकारण करतो. इतर पक्ष सदैव राजकारण करत असतात, असा टोला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे. कल्याणमधील बहुप्रतिक्षित पत्री पुलाचा गर्डर बसवण्याच्या कामाला अखेर आजपासून सुरुवात झाली. आदित्य ठाकरे यांनी आज येथे उपस्थिती लावत कामाची पाहणी केली.यावेळी त्यांनी पत्री पुलावरून राजकारण करणाऱ्यांवर निशाणा साधला.

कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पत्री पुलाचे काम गेल्या दीड वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरू आहे. आज अखेर या कामाला मुहूर्त मिळाला. २१ ते २२ नोव्हेंबरला पुलाचे काम होणार असून त्यासाठी मध्ये रेल्वेवर विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी या सर्व कामाची पाहणी केली. त्यानंतर प्रसाध्यमांशी त्यांनी संवाद साधत या संदर्भात माहिती दिली. पत्री पुलाचा मोठा प्रश्न होता. आज पुलाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही अशीच विकासाची कामे संपूर्ण महाराष्ट्रात करत आहोत. महाराष्ट्राला पूढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.

पत्री पुलावरून राजकारण झाले याबाबत प्रश्न विचारला असता,आदित्य ठाकरे म्हणाले, “राजकारण सगळ्यावरून होते. आम्ही राजकारण नुसते निवडणुकीसाठी करत असतो. निवडणूक झाल्यानंतर आम्ही कामे करतो. इतर काही पक्ष सदैव राजकारण करत असतात, त्यांना ते करू द्या”,असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, मनसेनेकडून देखील पत्री पुलाचा प्रश्न अनेकदा उचलून धरण्यात आला होता. तर आता कामाला सुरुवात झाल्यानंतर भाजपच्या स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांनी पुलासंदर्भात केंद्राचे आभार मानले आहेत. त्यामुळे पत्री पुलावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये श्रेयवाद रंगण्याची देखील चिन्हे आहेत.

Previous article१५ दिवस उलटूनही राज्यपालांकडून १२ नावांवर निर्णय नाही; शिफारशीला न्यायालयात आव्हान
Next articleअमित शाहांनी सांगितले म्हणून मनपा शिवसेनेसाठी सोडली होती; चंद्रकांत पाटलांचा खुलासा