एसटी महामंडळाचे खासगीकरण करण्याचा ठाकरे सरकारचा डाव

मुंबई नगरी टीम

जालना : एसटी महामंडळ तोट्यात असताना राज्य कर्मचाऱ्यांची देणी,तसेच इतर प्रशाकीय खर्चासाठी महामंडळाने एसटी बस डेपो तसेच एसटी बसेस तारण ठेवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.एसटीच्या आगारांना तारण ठेवायला कर्मचाऱ्यांचा आणि संघटनांचा विरोध आहे.त्यात बस सुध्दा गहाण ठेवण्यात येणार आहेत त्यामुळे २ हजार कोटींच्या कर्जाच्या नावाखाली एसटी महामंडळाचे खासगीकरण करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा हा डाव असल्याचा जोरदार आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज केला.

औरंगाबाद विभाग (मराठवाडा) पदवीधर मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ परतुर,जालना येथे पदवीधर-शिक्षकांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर बोलत होते.यावेळी माजी मंत्री, आमदार बबनराव लोणीकर,उमेदवार शिरीष बोराळकर, युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य मनोज पांगारकर, मदनलाल,संदीप गोरे,जिजाबाई जाधव आदि मान्यवर आणि पदवीधर उपस्थित होते.यावेळी त्यांनी ठाकरे सरकारच्या चुकीच्या धोरणावर सडकून टिका केली. ते म्हणाले की, राज्य सरकारला कर्ज उभारणीसाठी परवानगी असतानासुध्दा एसटी महामंडळ वेगळे कर्ज का घेत आहे. कारण एसटी महामंडळाला कर्जाचा हप्ता भरण्याची क्षमता दिस नाही तो हप्ता त्यांना भरता आला नाही तर हळूहळू एसटीचे आगार आणि बस यांचा लिलाव करावा लागेल.त्यामुळे एसटीच्या खासगीकरणाच्या डाव यामागे आखला जात असून यास आम्ही विरोध करु असेही त्यांनी स्पष्ट केले.

पदवीधर मतदार संघातून निवडून आलेले आमदार व सध्याचे राष्ट्रवादी कॉंग्रसचे उमेदवार गेली १२ वर्ष आमदार होते.या इतक्या वर्षात ते कधी आपले प्रश्न विचारायला आले का…शिक्षकांचे काय प्रश्न आहेत…पदवीधरांची काय प्रश्न आहेत याची त्यांना परवा नाही अशी टिका करताना दरेकर म्हणाले की, जर १२ वर्ष या आमदाराने फुकट घालवली असतील तर त्यांना अजून संधी देणार आहे का…ते विधानपरिषद सभागृहाचे प्रतिनित्व करतात, त्याच सभागृहाचा मी विरोधी पक्ष नेता आहे पण या आमदारांनी सभागृहात शिक्षक , पदवीधर यांच्या प्रश्नांवर एकही प्रश्न विचारला ना त्यांच्या समस्या मांडल्या.सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणतात ते आमदार म्हणजे समस्यांची जाण असलेला नेता आहे.पण यांना त्या समस्यांची जाण तरी दिसायला पाहिजे, त्या जाणून घेण्यांसाठी लोकांमध्ये तरी जायला पाहिजे असा टोलाही दरेकर यांनी मारला.

भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर गेली २५-३० वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते म्हणून सर्वांना परिचित आहेत, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे , क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणारे बोराळकर यांना छत्रपती पुरस्कार मिळाला आहे तसेच त्यांचे कार्य सांस्कृतिक क्षेत्रातही आहे. पदवीधारांचे मुद्दे ते नेहमीच मांडत असतात तसेच ते पदवीधरांचा प्रतिनिधी म्हणून ते काम करतात. त्यांच्या प्रश्नांना तडीस नेतात व त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यामुळे असे सामाजिक कार्य करणा-या उमदेवारांना पदवीधर मतदारांनी संधी द्यावी असे आवाहनही दरेकर यांनी यावेळी केले.

Previous articleमी ज्या म्हशीचा अपमान करण्याची हिम्मत केली त्याला चद्रकांत पाटलांचा पाठिंबा ?
Next articleसगळ उघडलं म्हणजे कोरोना गेला असं समजू नका : मुख्यमंत्री