मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे.शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे तीन पक्षांचे सरकार स्थापन करताना नेहरू सेंटर मध्ये झालेल्या मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली.विधानसभेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाता कामा नये अशी भूमिका खरगे वगैरे मंडळींनी घेतली.तेथे खरगे व शरद पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली.पवारांना इतके संतापलेले मी प्रथमच पाहिले.ते त्राग्याने टेबलावरचे कागद गोळा करून निघून गेल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक मध्ये केला आहे.
सामनाच्या रोखठोक मध्ये खासदार संजय राऊत यांनी सत्तास्थापनेमधील घटनाक्रम मांडला आहे.२८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.निकालाआधी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकमेकांचे राजकीय वैरीच होते.तरीही त्या तिघांचे सरकार बनले.भारतीय जनता पक्षाचे स्वतःचे व इतर मिळून ११२ आमदार असूनही त्यांना विरोधी बाकांवर बसावे लागले.त्यामुळे त्यांच्या दृष्टीने महाविकास आघाडीचे सरकार अनैसर्गिक आहे.अनैसर्गिक सरकार लवकरच पडेल असे त्यांचे भाकीत आहे,पण ते कसे पडेल,कोण पाडेल हे सर्व गुप्त कारवाया व राष्ट्रीय तपास यंत्रणांवर अवलंबून आहे. ‘ईडी’सारख्या संस्थांनी स्वतःचे सत्त्व गुंडाळून मालकाचे हुकूम पाळायचे ठरवले तरी महाराष्ट्राचे सरकार टिपून राहील हे मी जबाबदारीने सांगतो असे राऊत यांनी रोखठोक मध्ये म्हटले आहे.
शरद पवार व माझ्यात ३५ दिवस सुरू असलेल्या गाठीभेटी हा निव्वळ टाईमपास आहे असा अपप्रचार सुरू झाला होता.१७ नोव्हेंबरला पत्रकारांनी मला विचारले,”तुमच्याकडे किती आमदारांचे पाठबळ आहे ?” तेव्हा ”आमचा आकडा १७० आहे” असे मी सांगितले. त्या १७० आकडय़ाची खिल्ली उडवण्यात आली होती.तोपर्यंत सरकार स्थापनेसंदर्भात काँगेसचा स्पष्ट होकार आला नव्हता,पण अहमद पटेलांसारखे नेते सकारात्मक बोलत होते. मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष सत्तेच्या वाटणीत राष्ट्रवादीला काय मिळत आहे यावरच होते. नेहरू सेंटरमधल्या २२ नोव्हेंबरच्या वाटाघाटीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली.विधानसभेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाता कामा नये अशी भूमिका खरगे वगैरे मंडळींनी घेतली.तेथे खरगे व शरद पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली.पवारांना इतके संतापलेले मी प्रथमच पाहिले. ते त्राग्याने टेबलावरचे कागद गोळा करून निघाले. त्यांच्या पाठोपाठ मी व प्रफुल पटेल धावत गेलो त्याच बैठकीत सुरुवातीला आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे असतील हे पवार यांनीच सुचवले, पण खरगे,पवार चकमकीने बैठकीचा नूर पालटला.यानंतर अजित पवार हे बराच काळ त्यांच्या मोबाईल फोनवर खाली मान घालून ‘चॅटिंग’ करत होते.त्यानंतर तेही बैठकीतून बाहेर पडले.अजित पवारांचा फोन त्यानंतर ‘स्विच ऑफ’ झाला व दुस-या दिवशी पहाटे त्यांचे दर्शन थेट राजभवनावरील शपथविधी सोहळय़ात झाले. फडणवीस-अजित पवारांचा शपथविधी सुरू असतानाच एक महत्त्वाचा फोन मला आला, ”तुमचे सरकार बनत नाही. फडणवीस-अजित पवार शपथ घेत आहेत.अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडली. पक्ष आणि कुटुंबात फूट पडल्याचे सुप्रिया सुळे यांनी सोशल माध्यमांवर मान्य केले आहे.” मी त्याक्षणीही सांगितले, ”चार वाजेपर्यंत थांबा. अजित पवारांसोबत गेलेले परत येतील. स्वतः अजितदादाही गुदमरून परत फिरतील.पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार, अमित शहा यांच्यात दिल्लीत बैठक झाली अशा प्रकारच्या गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस अशी बैठक झाली व त्यात पहाटेच्या शपथविधीचे ‘नाटय़’ तयार झाले हे सर्वस्वी चूक आहे. अमित शहा यांच्या घरी एक बैठक झाली. त्यात एक बडे उद्योगपती व राष्ट्रवादीचे नेते असावेत. पवार या काळात दिल्लीत असताना त्यांच्यात व माझ्यात उत्तम संवाद होता व जवळ जवळ रोजच आम्ही भेटत होतो.नक्की कोठे काय सुरू आहे याचे ‘अपडेटस्’ एकमेकांना देत होतो. भारतीय जनता पक्षाशी कोणतेही डील करण्याच्या मनःस्थितीत मला पवार दिसले नाहीत. ”भाजपकडून सरकार बनविण्यासंदर्भात विविध स्तरांवरून ऑफर्स येत आहेत” हे त्यांचे सांगणे होते. ”लवकरच पंतप्रधान मोदी यांना भेटून मी भाजपबरोबर सरकार स्थापन करणे शक्य नाही असे सांगणार आहे” हे त्यांनी मला सांगितले.याच काळात शेतक-यांच्या प्रश्नांवर पवार मोदींना भेटायला गेले व महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबत सांगायचे ते सांगून आले. त्यामुळे पवारांनी भाजपला शब्द दिला होता व त्यानुसार पहाटेच्या हालचाली झाल्या हे खोटेच आहे असेही राऊत यांनी रोखठोक मध्ये नमूद केले आहे.
महाराष्ट्रातील सध्याचे अनैसर्गिक सरकार टिकणार नाही असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगतात आहेत. राजकारणात कुणी साधुसंत वगैरे नसतो. तसे कोणतेही सरकार हे नैसर्गिक किंवा अनैसर्गिक नसते.जोपर्यंत एखादे सरकार टिकून आहे तोपर्यंत ते नैसर्गिक न्यायाचेच असते. सध्याचे सरकार अस्थिर करण्यासाठी सी.बी.आय.,ईडीसारख्या यंत्रणांचा वापर सुरू आहे. बेकायदेशीर बांधकाम, आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखे गुन्हे करणा-यांना अभय दिले जात आहे. हे सर्व राजकीय दाबदबावाचे प्रकार न्यायाचे आणि नैसर्गिक तितकेच’ठाकरे सरकार’ही नैसर्गिक मानावेच लागेल. विधानसभेत या सरकारने बहुमत सिद्ध केले आहे.त्यामुळे ते घटनेच्या चौकटीत आहेच.निवडणुकांचे निकाल ते शपथविधी हा ३७ दिवसांचा रोमांचक प्रवास होता.या सर्व दिवसांतील बहुतेक सर्व घडामोडींचा मी साक्षीदार आहे. महाराष्ट्राबरोबर यात दिल्लीच्याही घडामोडी आहेत. सोनिया गांधी, शरद पवार, नरेंद्र मोदी, सोनिया गांधी या प्रमुख पात्रांनी वठवलेल्या भूमिका महत्त्वाच्या.या सगळय़ात पंतप्रधान मोदी यांची भूमिका मूक चित्रपटातील नायकाची होती व भाजपचे सरकार यावे म्हणून अमित शहा दिग्दर्शकाच्या भूमिकेत होते असा दावाही राऊत यांनी रोखठोक मध्ये केला आहे.
२३ नोव्हेंबरला पहाटे राजभवनात देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा शपथविधी झाला. हा रोमांचक, थरारक,तितकाच रहस्यमय चित्रपट ‘गोल्डन ज्युबिली’ चालेल असे दुपारी बारा वाजेपर्यंत अनेकांना वाटत होते,पण पहिल्याच शोला हा चित्रपट कोसळला व त्यानंतर खेळ जास्तच रंगला.महाराष्ट्राच्या राजकारणात इतका रंगतदार व अखेरच्या चेंडूपर्यंत खेळला जाणारा सामना कधीच झाला नव्हता असेही राऊत यांनी म्हटले आहे.’आघाडी सरकारमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत. त्यातील एखादा पक्ष बाहेर पडल्याशिवाय सरकार पडणार नाही.’ हेच सत्य आहे. यापैकी एकही पक्ष आघाडीतून बाहेर पडण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे मध्य प्रदेश किंवा राजस्थान पॅटर्न वापरायचा हे ठरवले, पण राजस्थान पॅटर्न फसला व मध्य प्रदेशात ‘सिंधिया’ पॅटर्न यशस्वी झाला.अजित पवार यांच्यावर लक्ष ठेवा असे अलीकडे सातत्याने सांगितले जाते, पण आज सगळय़ात जास्त भरवशाचे तेच आहेत अशी स्तुतीही राऊत यांनी केली आहे. संपूर्ण बहुमताचे सरकार असले तरी त्यात नाराज असतातच आणि इथे तर तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे. मंत्र्यांची व काही आमदारांची नाराजी व्यक्तिगत मानपानाची आहे. ती मुख्यमंत्र्यांनाच दूर करावी लागेल असेही राऊत यांनी म्हटले आहे.