शाहू,फुले,आंबेडकरांच्या विचारांची पिढी घडवा, शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई नगरी टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त पक्षातर्फे मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये ‘८ दशके कृतज्ञेची’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारांची पिढी घडविण्याचे आवाहन कार्यकत्यांना केले. जीवनामध्ये विचारधारा जपणे अत्यंत महत्त्वाचे असून ती स्वीकारली त्या दिशेने जाण्याचा अखंड प्रयत्न करायचा असतो. हा प्रयत्नच इतर सगळ्या पिढीच्या लोकांना प्रोत्साहन देत असतो, असे ते म्हणाले. तसेच महाराष्ट्राच्या जनतेमुळेच मी इथपर्यंत आलो, असे म्हणत त्यांनी सर्वांचे आभार मानले.

या कार्यक्रमानिमित्त शरद पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत शाहू, फुले आणि आंबेडकरांची विचारधारा पुढे घेऊन जाण्याचे आवाहन केले. तर केवळ शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख करून चालणार नाही. त्यांनी दिलेल्या दृष्टीतुन एक प्रकारची समाज मानसिकता तयार करण्याची जबाबदारी घ्यावी लागेल, असे ते म्हणाले.यावेळी शरद पवार यांनी महात्मा फुले यांचा मुंबईच्या गेटवे येथे पंचम जॉर्ज यांच्यासोबत घडलेली घटना सांगितली. पंचम जॉर्ज ज्यावेळी आले त्यावेळी पोलिस पगडी बांधलेल्या इसमाला बाजुला करत होते ही बाब लक्षात आल्यावर पोलिसांना बाजुला करुन पंजम जॉर्ज यांनी महात्मा फुले यांची भेट घेतली. त्यावेळी फुले यांच्या हातात शेतक-यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टींचे मागणी पत्र होते.शेतकऱ्यांना संकरीत बियाणांचे वाण,कास्तकरी दुधाचा व्यवसाय करतो.त्यांच्याकडे असलेल्या समरक्ताच्या गायी त्यातून पुढे कमी दूध देणारी पिढी याची माहिती देताना शेतक-यांना, कास्तकरी लोकांना संकरीत गायींचा पुरवठा करण्याची मागणी केली. त्यावर इंग्रज सरकारने विचारही केला होता. म्हणजे आधुनिक विज्ञानाचा विचार महात्मा फुले यांनी त्यावेळी केला होता तोच विचार पुढे शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांनी केला असेही यावेळी पवार यांनी सांगितले.

सार्वजनिक जीवनात आपण सगळे काम करत असतो. ज्यावेळेस शेवटच्या माणसाच्या हितासाठी तुम्ही लक्ष देता, तेव्हा तिथे तुम्हाला पुढचा रस्ता कोणता असला पाहिजे याची स्पष्टता मिळते. सजग राहून समाजकारण करण्याची संकल्पना राबवली पाहिजे. गेल्या ५० वर्षांपासून मी राजकारणात काम करत आहे. ही संधी मला महाराष्ट्राच्या जनतेने दिली. त्यामुळे मला इथपर्यंत येता आले, असे म्हणत त्यांनी लोकांचे आभार मानले.यावेळी पवारांनी कौटुंबिक आठवणींना देखील उजाळा दिला.माझे एकाप्रकारचे भाग्य आहे की,स्वातंत्र्यपुर्व काळामध्ये त्यावेळच्या गांधी-नेहरूंच्या विचारांची पताका घेऊन काम करण्याचे सूत्र माझ्या आईने स्वीकारले. ते काम करत असताना कौटुंबिक जबाबदारी सुद्धा कटाक्षाने पाळली पाहिजे, ही भूमिका देखील आयुष्यभर निभावली. याचा लाभ म्हणून आम्हाला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन लाभला असेही शरद पवार म्हणाले.कोरोनाकाळ असल्यामुळे वाढदिवसाचा कार्यक्रम घेण्याचे मी टाळत होतो. पण जयंतरावांनी एका ठिकाणी सर्व राज्यातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना एकत्र आणायची संकल्पना मांडली, त्यामुळे मला नाही म्हणता आले नाही. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनात नवीन पिढी काम करताना दिसली याचा आनंद आहे. हीच नवीन पिढी पुढे राज्यात काम करेल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

दरम्यान, त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कुठे मोठं मोठे बॅनर तर कुठे त्यांची हुबेहूब रांगोळी साकारण्यात आली. काही ठिकाणी रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Previous articleसरकारी कर्मचा-यांना कार्यालयात जीन्स टी-शर्ट,रंगीत कपडे आणि स्लिपर वापरण्यास बंदी
Next articleशरद पवार@८०; पंतप्रधान मोदींसह ‘या’ दिग्गज नेत्यांनी दिल्या शुभेच्छा