मुंबई नगरी टीम
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आज वाढदिवसानिमित्त त्यांना अनेक राजकीय नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांनीही पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यात विरोधक देखील मागे नाहीत.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहत शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तुमच्या कार्याच्या अनुभवाचा फायदा आघाडी सरकारला व्हावा, अशी आशा आहे. तुम्हाला उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. या शुभेच्छा देताना देखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावण्याची संधी काही सोडलेली दिसत नाही.
“राजकारणात मतभेद अनेकदा असतात, पण मनभेद कधीच नसतात. भिन्न विचारसरणीचे मात्र अनेक राजकारण्यांचे मार्गदर्शक असलेल्या शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. शरद पवार यांना राजकारणाचा तब्बल 50 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी तीन वेळा पदभार सांभाळला आहे. राज्याच्या हितासाठी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. स्थानिक स्वराज संस्थेत महिलांना 50 टक्के आरक्षण देऊन शासन प्रक्रियेत सामावून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय शरद पवार यांनी घेतला. देशाचे कृषी मंत्री असताना शेती व दुग्ध उत्पादन क्षेत्रात त्यांनी वाखाणण्याजोगे काम केले. शेतकरी सर्व बंधनातून मुक्त होऊन जीवनात पुढे जाऊ शकतात, अशा सर्व विधेयकांना त्यांचे समर्थन मिळाले आहे आणि पुढेही ते मिळेल”, अशी आशा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
कोरोना काळातही वयाची पर्वा न करता, आपल्या सहयोगी पक्षातील काही नेत्यांना लाजवतील असे दौरे आपण केले, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. राजकारणात आपले विचार व आदर्श वेगळे राहतील, परंतु महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी आपण सरकारमध्ये आणि सरकारच्या बाहेर देखील नेहमीच मार्गदर्शन करात राहाल, अशी अंबाबाई चरणी प्रार्थना करतो, अशा सदिच्छा चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत.