कुणीही कुणाबरोबर गेले तरीही मुंबई महानगरपालिका शिवसेनेचीच

मुंबई नगरी टीम

नाशिक : विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत भाजपकडून ‘मिशन मुंबई’ची तयारी केली जात असून मुंबई महानगरपालिकेवरून शिवसेनेचा भगवा उतरवण्याची रणनीती आखली जात आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून भाजप आणि मनसेची युती होण्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसेला टोला लगावला आहे.कुणीही कुणाबरोबर गेले तरीही मुंबई महानगरपालिका शिवसेनेचीच राहणार असे सांगतानाच त्यांनी नाशिकचा पुढचा महापौर आमचाच होईल, असा दावाही केला आहे.

संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे सांगितले. “स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक एकत्र लढण्याचे ठरवले आहे. एकत्र लढल्यामुळे काय निकाल लागतो हे आपण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अनुभवले आहे. निवडणुकीत मतदारांनी जो कौल दिला ती आम्ही जनतेची नाडी समजतो. राजकारणाची हवा बदलत आहे. आम्हाला लोकमताचा पाठिंबा नाही, असे भाजपचे काही लोक म्हणत होते. परंतु जेव्हा बहुमताचा आकडा एकत्र होतो ते लोकमतच असते. त्यामुळे आमच्या प्रमुख नेत्यांची भूमिका आहे की, प्रमुख महानगरपालिकांमध्ये एकत्र निवडणुका लढल्यास चांगले निकाल लागतील. स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भूमिका वेगळी असते. पण आम्ही एकत्र बसू, निर्णय घेऊ. आता मुंबई महानगरपालिकेत शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. नाशिकमध्ये आम्ही दुसऱ्या क्रमांकावर आहोत. पण, महाविकास आघाडीच्या अनुषंगाने विचार केल्यास तर आम्ही पहिल्या क्रमांकावर आहोत. प्रत्येकाचा सन्मान राखून एकत्र निवडणुका लढवाव्यात असा आमचा विचार सुरू आहे”, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

हैदराबाद पॅटर्ननुसार भाजपने मिशन मुंबई सुरू केले असून मनसे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, “आता हैदराबादमध्ये त्यांना ओवेसी मिळाले. मुंबईत कुठल्या पक्षातून ते ओवेसी निर्माण करतात हे बघावे लागेल”. मनसे भाजपसोबत जाणार यावर राऊत म्हणाले, “जाऊद्या, कुणीही कुणाबरोबर गेले, तरीही मुंबई महापालिका ही शिवसेनेकडेच राहील. सध्याच्या स्थितीमध्ये काही बदल होणार नाही. पुढचा नाशिकचा महापौर शिवसेनेचाच होईल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षातील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी पवारांच्या राजकीय प्रवासाविषयी लेख लिहला होता. ज्यामध्ये काँग्रेसने पवारांवर अन्याय केल्याचा उल्लेख आहे. याविषयी बोलताना राऊत म्हणाले, “पवारांवर काँग्रेसने अन्याय केला आहे, हे मी वारंवार म्हणत आलो आहे. शरद पवार हे या देशातले गेल्या २५ वर्षांपासूनचे असे नेते आहे, ज्यांना पंतप्रधानपदाची संधी आधीच मिळायला पाहिजे होती. आज त्यांचे वय ८० झाले आहे. असे मोठे नेते लोकांमध्ये राहणारे, ते वयाच्या बंधनात अडकून पडत नाही. वयाच्या बेड्या त्यांना थांबवत नाहीत. ते धावत असतात, पळत असतात. देशाचे नेतृत्व करण्याची सगळ्यात जास्त क्षमता असलेले नेते कोणते असतील, सध्याच्या काळात, तर ते केवळ शरद पवार आहेत. पण, शरद पवारांचे कर्तृत्व हे त्यांच्या प्रवासातील सर्वात मोठा अडथळा ठरले. कमी कुवतीच्या लोकांना शरद पवारांच्या कर्तृत्वाची कायम भीती वाटत आली. म्हणून उत्तरेकडील नेत्यांनी शरद पवारांना कायम अडथळ्यात टाकण्याचे काम केले. शरद पवार केव्हाच पंतप्रधान व्हायला हवेत होते. पण होऊ द्यायचं नाही, या एका द्वेषापोटी शरद पवारांना कायम रोखण्यात आले,” असे संजय राऊत म्हणाले.

Previous articleचंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा
Next articleकिल्लारीच्या भूकंपात मृत्यूला जगण्याची उमेद देणारा माणसातला देव मी पाहिला