मुंबई नगरी टीम
मुंबई : आरे येथे वेळेमध्ये मेट्रो कारशेड तयार झाली असती तर मुंबई मध्ये मेट्रो धावली असती,पण कारशेडबाबत विनाकारण राजकारण करत मेट्रो कारशेडची जागा अन्यत्र हलविण्याच्या राजकारणामुळे जनतेला मेट्रोपासून वंचित राहावे लागले.आता तर न्यायालयाने चपराक दिल्यानंतर सरकारने पुन्हा बुलेट ट्रेनच्या जागेवरुन राजकारण सुरु केले आहे.हे सरकार अहंकारी आहे व मेट्रोकारशेडबाबत सरकारला त्यांचा अहंमपणा महागात पडल्याची टिका करतानाच,शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या बळावर निवडणूक लढल्या व जिंकल्या.बाळासाहेबांना मानणारा वर्ग महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सांगितले.
मागाठाणे विधानसभा क्षेत्रात संजीवनी इंटरनॅशनल स्कूल,वैशाली नगर दहिसर (पू) येथे उत्तर मुंबईतील प्रशिक्षण वर्ग २०२० कार्यक्रमात,विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी राज्यातील राजकीय पार्श्वभूमी व पक्षाची भूमिका,या विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दरेकर यांनी सांगितले की, पक्षामध्ये काम करताना कार्यकर्ता हा प्रशिक्षितच असला पाहिजे. राजकीय व सामाजिक परिस्थितीचे सर्व ज्ञान त्याला असायला पाहिजे, असा ज्ञानी कार्यकर्ता भाजपमध्ये आहे.अन्य राजकीय पक्षांमध्ये एखाद-दुसरा कार्यक्रम होत असतात परंतु आपला पक्ष हा प्रशिक्षणाला अनन्यसाधारण महत्व देतो. आपल्या पक्षाला वेगळा इतिहास आहे. दिनदयाळ उपाध्याय, शामाप्रसाद मुखर्जी तसेच अटल बिहारी वाजपेयी अशी एक जबरदस्त विचार देणारी मंडळी होती. विरोधी पक्ष नेता म्हणून अटलजींचे काम हे आदर्श नेता म्हणून अजूनही लक्षात येतं. अनेक पंतप्रधान होऊन गेले पण त्यांचे नाव आपल्याला आठवत नाही परंतु अटलजी यांच्या कामाची आठवण आपण आजही आपण काढतो. आपण छोटे कार्यकर्ते असूनही ज्या पदावर आपण काम करतो त्या पदाची उंची वाढवणं हे आपलं काम आहे. राजकीय क्षेत्रात काम करताना राजकीय क्षेत्रामधील घडामोडी माहित असणं गरजेच आहे. इतरत्र काय चालू आहे एक सतर्क कार्यकर्ता म्हणून राजकीय व समाज कार्यासाठी अत्यंत आवश्यक आहे असेही दरेकर यांनी सांगितले.
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एका वर्षांपूर्वी विधानसभा निवडणूक लढवल्या.भाजप आणि शिवसेनेने ही निवडणूक एकत्रित लढवली होती आणि जनतेने विश्वास दाखवत सत्ता आपल्या हातात दिली होती. पण शिवसेनेने दोन पक्षांच्या खांद्यावर झेंडा ठेवून सत्ता स्थापन केली. त्यामुळे जनतेच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. तो असंतोष दूर करण्यासाठी नागरिकांच्या संपर्कात यावं लागेल, त्यांना समजावं लागेल. महाविकास आघाडी एकत्रित जरी आली असती तरी तळागाळातील कार्यकर्ता आहे तो एकजीव होऊ शकत नाही,असे दरेकर यांनी सांगितले.
देशभरात आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी यश मिळालं त्यामुळे देशभरात आपल्यासाठी पूरक पोषण वातावरण आहे. जेव्हा राज्यात पदवीधर शिक्षक निवडणूक झाल्या तेव्हा आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं . राज्यात अश्या प्रकारच राजकारण सुरु आहे. तर ते का सुरु आहे याचं आकलन आपण केलं पाहिजे, आपण कुठे कमी पडलो याचा अभ्यास करायला हवा असे सांगतांना दरेकर म्हणाले की, तीन वेगेवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्रित येऊन सत्ता स्थापन केली. त्यांना असं वाटत असेल आपल्या डोक्यावर सत्तेचा मुकुट आहे परंतु तीन पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहे. बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या बळावर निवडणूक लढल्या व जिंकल्या. बाळासाहेबांना मानणारा वर्ग महाविकास आघाडी सरकारवर नाराज आहे असेही त्यांनी सांगितले.राज्यात अनेक कायदे व योजना आहेत, आपण कार्यकर्ता म्हणून ते कायदे किंवा योजना समजून घेणे आवश्यक आहे असे सांगतांना दरेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्रासाठी प्रगतीपर असा कायदा केला पण तो समजविण्यास आपण कुठेतरी कमी पडलो. आपले सरकार असताना अनेक विकास काम केली, पण या सरकारने त्या कामांना दिली. जर आपल्याला पुन्हा सत्तेवर यायचे असेल तर कार्यकर्तांनी तळागळात जाऊन जनतेशी संपर्क साधला पाहिजे ज्या विभागाचा प्रमुख वा बुथ प्रमुख यांनी अधिक सक्षमपणे काम करणे गरजेच आहे .
ते म्हणाले की, तिन्ही पक्ष एकत्रित येऊन आपल्यावर आक्रमण करत असेल तर आपण एकनिष्ठेने हम भी कुछ काम नहीं हे दाखवून दिले पाहिजे. मुंबई महापालिकेत २४-२५ वर्ष शिवसेनेची सत्ता असुन आजही मुंबईचे चे प्रश्न जैसे थे आहेत तरीही आपण त्यांना का प्रश्न विचारून त्याच्यावर का तोडगा काढत नाही असा सवाल करताना ते म्हणाले की, तिन्ही पक्ष वेगवेगळ्या विचारांचे आहेत . कालच सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे याना पत्र लिहिले, समान कृती कार्यक्रमांची अंमलबाजवणी राज्यात होत नाही. त्यामुळे त्यांच्यात जे काय होणार आहे ते होणार आहे परंतु आपल्याला खंबीर राहणे गरजेचं आहे. अनेक प्रकल्पांना आपल्या सरकारच्या काळात परवानगी दिली असून त्या प्रकल्पात खोडा घालण्याचे काम हे सरकारने करीत आहे. त्यामुळे आपण सरकारचे दोष लोकांपर्यंत पोहचविले पाहिजे. असे आवाहनही दरेकर यांनी केले.महाराष्ट्रात अनेक विषय सरकारच्या विरोधात आहे, मराठा आरक्षणबाबत भूमिका नाही, ओबीसीचे आरक्षण, धनगर समाज नाराज, शेतक-यांना मदत अजून पोहचली, अर्थव्यवस्था ठप्प झालेली आहे त्यामुळे सर्व ठिकाणी हे सरकार अपयशही ठरलं आहे फक्त त्यांचं अपयश जनतेच्या दरबारात सांगण्याचे काम आपलं आहे असे कार्यकर्त्यांना दरेकर यांनी सागितले.