ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दिले संपर्क प्रमुखांना महत्वाचे आदेश

मुंबई नगरी टीम

मुंबई : पुढील महिन्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयार सुरू केल्याचे दिसत आहे. यासाठी आता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील स्वतः मैदानात उतरले असून त्याकडे जातीने लक्ष घालत आहेत. या पार्श्वभूमीवर आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी संपर्कप्रमुखांना निवडणुकीसाठी रणनीती आखण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जिल्हा प्रमुखांशी देखील चर्चा करत ग्रामपंचात निवडणुकीत शिवसेनेला नंबर वन पक्ष करण्याचे आदेश दिले होते.

उद्धव ठाकरे आणि शिवसेना संपर्क प्रमुखांमध्ये आज शनिवारी वर्षा बंगल्यावर खलबते झाली. बैठकीत आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भातील तयारीवर चर्चा करण्यात आली. राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. तर १५ जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. शिवसेना या सर्व ग्रामपंचायतींवर लढणार असून त्यासाठी पक्षाने कंबर कसली आहे. या निवडणुकीत शिवसेना नंबर वनचा पक्ष झाला पाहिजे, त्यासाठी ताकदीने मैदानात उतरण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

दरम्यान, राज्यात नुकतीच पदवीधर-शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने प्रथमच एकत्रित येऊन निवडणूक लढवली आणि दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे धाबे चांगलचे दणाणले.येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीतही तिन्ही पक्ष एकत्र लढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या एकीचे बळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे

Previous articleसोनिया गांधींच्या पत्रावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात काय म्हणाले ?
Next articleबाळासाहेब ठाकरे यांना मानणारा वर्ग महाविकास आघाडी सरकारवर नाराज