मुंबई नगरी टीम
नागपूर : राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी निवड करण्यात आली आहे यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ठाकरे सरकारच्या हस्तक्षेपामुळेच डीजीपींनी प्रतिनियुक्ती मागितली,असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गेल्या काही महिन्यांत पोलिसांच्या बदल्या आणि राजकीय हस्तक्षेपावरून जयस्वाल आणि राज्य सरकारमध्ये विसंवाद निर्माण झाला होता.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना महासंचालकांच्या नियुक्तीवर भाष्य केले. यावर अधिक बोलताना ते म्हणाले की, पोलीस महासंचालकांना विश्वासात न घेता राज्यात पहिल्यांदाच असा पोलीस विभागाचा कारभार चालला आहे. त्यामुळेच सुबोध जयस्वाल यांनी नाराज होऊन प्रतिनियुक्ती मागितली होती. ती केंद्र सरकारने स्वीकारली आहे. यामुळे राज्य सरकारने समजून घेतले पाहिजे की पोलिसिंग हा एक स्वतंत्र विभाग आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत ते येत असले, तरीही पोलीस विभागाला एक स्वायत्तता दिली आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे सुपरवायजरी काम अपेक्षित आहे. पंरतु आता छोट्यातल्या छोट्या बदल्यांपासून प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप वाढत चालला आहे, अशी टीका फडणवीसांनी ठाकरे सरकारवर केली.
सरकारच्या अशा हस्तक्षेपामुळेच अशाप्रकारचा निर्णय डीजीपींनी घेतला. राज्यात पहिल्यांदाच असे घडले की, सरकारच्या कारभाराला कंटाळून एखादे पोलीस महासंचालक प्रतिनियुक्तीवर चालले आहेत. महाराष्ट्रासाठी ही काही भूषणावह गोष्ट नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नोव्हेंबर महिन्यातच ट्वीट करत सुबोध जयस्वाल हे आपल्या पदावरून पायउतार होऊन केंद्रीय सेवेत जाणार आहेत, असे सांगितले होते. येत्या काळात ते राष्ट्रीय सुरक्षा बलाच्या सर्वोच्चपदी विराजमान होण्याची शक्यता चंद्रकांत पाटील यांनी वर्तवली होती.