नववर्षाच्या सुरुवातीलाच जग कोरोनामुक्त होवो; अजितदादांच्या शुभेच्छा

मुंबई नगरी टीम

मुंबई : “मावळतं वर्ष कोरोना संकटाशी लढण्यात गेलं, येणारं नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती,समृद्धी,उत्तम आरोग्य,समाधान घेऊन येवो, नववर्षाच्या सुरुवातीलाच संपूर्ण जग कोरोनामुक्त होवो,सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद घेण्याची संधी लवकर मिळो” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला २०२१ या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार नववर्षानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, मावळत्या २०२० वर्षानं आपल्याला जीवन जगण्यासंदर्भात अनेक नवीन गोष्टी शिकवल्या. त्या गोष्टींपासून बोध घेऊन नववर्षाची सुरुवात करुया. कोरोनाचं संकट अद्याप कायम असल्यानं मास्क लावणं, गर्दी टाळणं, हात वारंवार धुत रहाणं या त्रिसूत्रीचं पालन करुया. कोरोनापासून स्व:ताचं, कुटुंबाचं, समाजाचं संरक्षण करीत दैनंदिन व्यवहार हळुहळु काळजीपूर्वक सुरु करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं आहे. येणारं नवीन वर्ष राज्यातील शेतकरी, कष्टकऱ्यांसह सर्व बांधवांना विकासाची संधी उपलब्ध करुन देणारं, राज्याला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर नेणारं ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Previous articleएकनाथ खडसेंना कोरोनाची लागण ; अहवाल पॉझिटिव्ह
Next articleठाकरे सरकारच्या हस्तक्षेपाला कंटाळून पोलीस महासंचालकांनी प्रतिनियुक्ती मागितली