एकनाथ खडसेंना कोरोनाची लागण ; अहवाल पॉझिटिव्ह

मुंबई नगरी टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्दी,खोकला यासारखी कोरोना सदृश्य लक्षणे त्यांना जाणवत असल्याने त्यांनी १४ दिवस विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता.तसेच आपली कोरोना चाचणीही त्यांनी करून घेतली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खडसे सध्या मुंबईमध्येच मुक्कामी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल काल रात्री जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला.त्यात खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान,खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती.तत्पूर्वी खडसे यांनी आपल्याला सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवत असल्याचे ट्विट करत सांगितले होते त्यामुळे १४ दिवस विश्रांती घेऊन त्यानंतर आपण ईडी कार्यालयात हजर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काही दिवसांनीच १९ ऑक्टोबर रोजी एकनाथ खडसे यांना कोरोनाची बाधा झाली होती.तर योग्य उपचार घेऊन त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मातही केली होती.

Previous articleकाँग्रेसला कमकुवत करण्याचा राष्ट्रवादी-शिवसेनेचा डाव;सोनिया गांधींना पत्र
Next articleनववर्षाच्या सुरुवातीलाच जग कोरोनामुक्त होवो; अजितदादांच्या शुभेच्छा