काँग्रेसला कमकुवत करण्याचा राष्ट्रवादी-शिवसेनेचा डाव;सोनिया गांधींना पत्र

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात असून त्यात शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र काम करताना दिसत आहेत.सरकारमध्ये विसंवाद असल्याची टीका विरोधक वारंवार करतात. मात्र आमच्यात सर्व काही अलबेल असल्याचे दावे आघाडीतील नेते करताना दिसतात. मात्र पुन्हा एकदा या आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र समोर आले आहे. काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीत एकटे पाडण्याचे काम केले जात आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना काँग्रेसला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी तक्रार मुंबई काँग्रेसचे महासचिव विश्वबंधू राय यांनी थेट पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून केली आहे. राय यांच्या या पत्रामुळे महाविकास आघाडीतील धुडपूस पुन्हा एकदा समोर आली आहे.

विश्वबंधू राय यांनी सोनिया गांधींना पत्र लिहित काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधले आहे. त्यात प्रामुख्याने आघाडीतील दोन पक्षांकडून काँग्रेसच्या होणाऱ्या खच्चीकरणावर त्यांनी भाष्य केले आहे. आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला दुय्यम स्थान मिळत असल्याची तक्रार पत्राद्वारे करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र या वर्षभरात केवळ मित्र पक्ष म्हणूनच काँग्रेसचे आघाडीत स्थान राहिले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच सरकार चालवत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे, असे राय यांनी पत्रात म्हटले आहे.

आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांना पक्षासाठी तळागळातील लोकांपर्यंत काम करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच त्यांच्या मंत्र्यांकडे कुठले खाते आहे, हे माहित नाही. काँग्रेसचे नुकसान आणि स्वतःचा पक्ष मजबूत करण्यावर मित्रपक्षांनी भर दिला आहे. हे थांबवण्यात काँग्रेस अपयशी ठरत आहे. पुढे त्यांनी आणखी आरोप करत म्हटले की, २०१९मध्ये पक्षाने निवडणूक जाहीरनाम्यातून दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाही. काँग्रेसची व्होटबँक आपल्याकडे खेचण्यावर मित्र पक्षांनी भर दिला असून त्यात ते यशस्वी होताना दिसत आहेत. त्यामुळे पक्षातून होणारी गळती रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची गरज आहे. शिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादीला युती धर्माची आठवण करून देणेही गरजेचे आहे. दरम्यान, या पत्रामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादीची काय भूमिका असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Previous articleआमदार रोहित पवारांनी घेतला माजी मंत्री राम शिंदेंचा समाचार
Next articleएकनाथ खडसेंना कोरोनाची लागण ; अहवाल पॉझिटिव्ह