आमदार रोहित पवारांनी घेतला माजी मंत्री राम शिंदेंचा समाचार

मुंबई नगरी टीम

अहमदनगर : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडताना दिसत असून कर्जत-जामखेड मतदारसंघातही जोरदार प्रचार रंगलेला पहायला मिळत आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ३० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. यावर भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी टीका केली असता रोहित पवारांनी त्यांच्यावरच पलटवार केला आहे.त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत आमदार रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने आलेले पहायला मिळत आहेत.

राम शिंदे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यास विकास कामासाठी ३० लाखांचा भरीव निधी देण्यात येईल,असे मी म्हणालो, त्यात चुकीचे काय आहे. गावात गटतट नसावेत असा माझा हेतू आहे. मात्र गावात गटतट असावेत असा प्रामाणिक हेतू त्यांचा असावा, असा टोला रोहित पवारांनी राम शिंदेंना लगावला.गावक-यांनी गटतट विसरून विकासाचे राजकारण करावे, असा हेतू बक्षीस जाहीर करण्यामागे होता. मात्र त्यांना विकासाचे काम कळत नसेल. त्यांना गटतट कळत असतील तर त्याला मी काय करू, असेही रोहित पवार म्हणाले. तसेच राम शिंदे काय बोलतात यापेक्षा लोकांना काय हवे हे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ३० लाखांचे बक्षीस जाहीर केले. मात्र जाहीर केलेले बक्षीस म्हणजे प्रलोभन आहे, अशी टीका राम शिंदे यांनी केली होती. निवडणुकीत प्रलोभने दाखवणे, दबाव तंत्राचा वापर करणे हा प्रकार गैर असून आचारसंहितेचे उल्लंघन करणारा आहे. राज्य निवडणूक आयोगाने याची सखोल चाैकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्यातील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी असेच प्रकार सुरू राहिले, तर येत्या काळात टाटा, बिर्ला देखील आमदार-खासदार होतील, असा खोचक टोलाही त्यांनी रोहित पवारांना लगावला.

Previous articleबेरोजगारांना दिलासा :आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करणार
Next articleकाँग्रेसला कमकुवत करण्याचा राष्ट्रवादी-शिवसेनेचा डाव;सोनिया गांधींना पत्र