मुंबई नगरी टीम
मुंबई : रेणु शर्मा लैंगीक अत्याचार प्रकरण ताजे असतानाचा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात त्यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा यांनी पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.चित्रकूट या शासकीय बंगल्यात आपल्या मुलांना गेल्या तीन महिन्यांपासून डांबून ठेवले आहे असल्याचा गंभीर आरोप करूणा शर्मा यांनी केला असून,न्यायासाठी त्यांनी मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
रेणू शर्मा प्रकरणातून दिलासा मिळालेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. धनंजय मुंडे यांच्या दुस-या पत्नी करूणा शर्मा यांनी आज पोलीस महासंचालक यांच्याकडे आपल्या वकील यांच्यासोबत जाऊन लेखी तक्रार केली आहे. त्यात धनंजय मुंडे हे आपल्या दोन्ही मुलांना भेटू देत नाहीत.फोनवर बोलू देत नाहीत. चित्रकूट या शासकीय बंगल्यात आपल्या मुलांना गेल्या तीन महिन्यांपासून डांबून ठेवले आहे असा आरोप त्यांनी केला आहे. मी २४ जानेवारी रोजी भेटण्यास गेले असता पोलीसांनी मला भेटू दिले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे हे नशेबाज आहेत. चित्रकुट बंगल्यावर एकही महिला वास्तव्यास नाही.माझी मुलगी १४ वर्षांची आहे.मला तिची काळजी वाटते. माझ्या दोन्ही मुलांना ते माझ्या विरोधात भडकावत आहेत.माझी दोन्ही मुले चित्रकूट बंगल्यावर सुरक्षित नाहीत.माझ्या मुलांसंदर्भात काही वाईट घडल्यास त्याला मुंडे हेच जबाबदार असतील, असा इशारा करुणा शर्मा यांनी तक्रारीत दिला आहे.
तसेच धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरुन बरखास्त करण्यात यावे.यापुढे त्यांना कोणतीही निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवावे.जर मुंडे यांच्या विरोधात पोलीसांनी कायदेशीर कारवाई नाही केल्यास आपण आझाद मैदान,मंत्रालय किंवा चित्रकूट बंगला येथे २० फेब्रुवारीपासून आमरण उपोषणास बसणार आहोत,असे करुणा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.करुणा शर्मा यांनी भादंवि कलम ३७६, ३७७, ४२०, ४७१, ३२४, ५०६ (२) घरगुती हिंसाचार कायदा १८, १९आयटी अॅक्ट दाम्पत्य अधिकार कलम ९ अन्वये तक्रार केली आहे. या तक्रारीत करुणा यांनी करुणा धनंजय मुंडे असे नाव वापरले आहे.
करुणा शर्मा यांनी काय आरोप केले ?
करुणा शर्मा यांची गंभीर तक्रार असून, करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. इतकेच नाही तर आपल्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या चित्रकूट बंगल्याच्या मागच्या खोलीत तीन महिन्यापासून कोंडून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.