मुंबई नगरी टीम
मुंबई । नाना पटोले यांनी आज अधिकृतरित्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.मुंबईतील काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयात प्रदेश प्रभारी एच. के. पाटील आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत नाना पटोले यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर मरिन ड्राइव्ह ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत ट्रॅक्टर रॅली काढत नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. यावेळी त्यांनी काँग्रेस महाराष्ट्रात १ नंबरचा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार केला.तसेच यापुढे काँग्रेसच महाराष्ट्रात सत्तेत राहील, असे विधान पटोले यांनी केले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. राज्यसभेच्या माध्यमातून आंदोलनावर टीका केली, त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे पाप केले. या माध्यमातून आम्ही केंद्रात बसलेल्या सरकारला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत. देशाच्या अन्नदात्याचा अपमान जो कुणी करेल त्याच्याविरोधात या पध्दतीची व्यवस्था निर्माण केली जाईल असा संदेश देत आहोत,” असे नाना पटोले म्हणाले. “नरेंद्र मोदी यांचे सरकार जेव्हापासून आले आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी असताना देखील १०० रुपयांपर्यंत दर गेले आहेत. देशातील जनतेची लूट सुरु आहे तसेच महागाई त्याविरोधातही आम्हाला संदेश द्यायचा आहे. सामान्यांचे जगणे ज्यापद्धतीने मुश्किल केले त्याचाही संदेश आम्हाला द्यायचा आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
सध्या काँग्रेसमध्ये असलेल्या उत्साहाविषयी विचारण्यात आले असता ते म्हणाले, “मी परवा नागपुरात होतो. नागपुरातही परिवर्तनाची लाट दिसली. आज मुंबईमध्ये ती दिसत आहे. महाराष्ट्रात जी लाट पाहायला मिळत आहे ती केंद्रातील हुकूमशाही सरकारविरोधातील परिवर्तनाची लाट आहे. मुंबईत महात्मा गांधींनी परकीयांना बाहेर काढण्याचा जो विचार मांडला तोच विचार आम्ही मांडत आहोत. देशातील हुकूमशाही मोदी सरकारविरोधात ‘चले जाव’चा नारा आम्ही देणार आहोत. जनतेचा हा उत्साह पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेसची वाटचाल लक्षात येईल. काँग्रेस महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. पुढे काँग्रेसच महाराष्ट्रात सत्तेत राहणार,” असे विधान नाना पटोले यांनी केले.