बंद दाराआड काय चर्चा झाली ते आताच सांगून टाकतो – मुख्यमंत्री

मुंबई नगरी टीम

पालघर । गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि भाजपमध्ये बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली हे अद्यापही गुपितच आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच सिंधुदुर्गात आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेसोबत बंद दारआड झालेल्या चर्चेविषयी खुलासा केला. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये एकच सामना रंगलेला पाहायला मिळाला होता. तर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याच बंद दाराआडच्या चर्चेचा उल्लेख करत अमित शाह आणि भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जव्हारमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बंद दाराआडच्या चर्चेचा उल्लेख केला. “जव्हारमध्ये आलोय म्हणजे फक्त जव्हार नाही तर संपूर्ण पालघरचा विकास करायचा आहे. या विभागाला चांगला समुद्रकिनारा लाभला आहे. जव्हारसारखे एक चांगले ठिकाण हिल स्टेशन म्हणून विकसित केले जाऊ शकते. आदिवासी संस्कृती जपून आदिवासींचा विकास केला पाहिजे. पर्यटनासाठी विकास केला तर अनेक समस्या नष्ट होतील”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“नुसती आरोग्य व्यवस्था सदृढ करुन चालणार नाही. तर आदिवासींसुद्धा चांगला रोजगार मिळाला पाहिजे, जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे. दळणवळण, उद्योग, पर्यटन या सर्वांचा एकत्रित विचार केला पाहिजे,” असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी या सगळ्याबद्दल बंद दाराआड चर्चा केली, असे म्हटले. बंद दाराआड काय चर्चा झाली ते आताच सांगून टाकतो असे म्हणत ते मिश्किलपणे हसले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा अप्रत्यक्ष टोला नेमका कुणासाठी होता हे सर्वचजण समजून चुकले.

बंद दाराआड चर्चेचा संदर्भ काय?

मातोश्रीवर झालेल्या चर्चेवेळी शिवसेनाला मुख्यमंत्री पद देण्याचे भाजपने मान्य केले होते, असा दावा आतापर्यंत उद्धव ठाकरे करत आले आहेत. मात्र त्यांचा हा दावा सिंधुदुर्गात आलेल्या अमित शाह यांनी साफ खोडून काढला. बंद दाराआड असे कुठलेही वचन शिवसेनेला देण्यात आले नव्हेत. मी बंद दाराआड काहीच करत नाही. जे आहे ते खुलेपणाने करतो,असे म्हणत अमित शाह यांनी शिवसेनेला फटकारले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. परंतु आज अचानक त्यांनी बंद दाराआड चर्चेचा उल्लेख करत भाजपला टोला लगावला.

Previous articleराज्यपालांकडून रखडलेल्या आमदारांच्या नियुक्तीवर विरोधक का बोलत नाहीत ?
Next articleकाँग्रेस महाराष्ट्रात १ नंबरचा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही – नाना पटोले