राज्यपालांकडून रखडलेल्या आमदारांच्या नियुक्तीवर विरोधक का बोलत नाहीत ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यपाल भातसिंग कोश्यारी यांना सरकारी विमानाने प्रवास नाकारल्यावरून काल मोठा वादंग उठला होता. ठाकरे सरकार आणि राज्यपाल यांच्यातील नव्या वादाला तोंड फुटलेले असतानाच विरोधकांनीही यावर टीका टिप्पणी करण्यास सुरुवात केली. सूड भावनेतून ठाकरे सरकारने असे केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीच विरोधकांना उलट सवाल केला आहे. विधानपरिषद आमदारांच्या नियुक्तीचे घटनात्मक बंधन वेळेत पाळले जात नाही. त्यावर विरोधी पक्षातील नेते गप्प का?, असा प्रश्न करत रोहित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

विधानपरिषदेच्या आमदार नियुक्तीवरून राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यात अनेकदा वादाची ठिणगी पडताना दिसली. अशातच मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्यपालांना नाकारलेल्या विमान प्रवासामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली. भाजप नेत्यांनीही ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागले. त्यावर आज रोहित पवार यांनी ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला. “राज्यपालांच्या विमान प्रवासाबाबत सरकारने स्पष्टीकरण दिलं तरी सगळे विरोधक एकसूरात टिका करतायेत. पण विधानपरिषदेत आमदारांच्या नियुक्तीचं घटनात्मक बंधन वेळेत पाळलं जात नसताना विरोधी पक्षातील एकही नेता यावर का बोलत नाही? की संविधानाबाबत काहीच बोलायचं नाही असंच या सर्वांनी ठरवलंय ?”, असा पलटवार रोहित पवार यांनी केला.
राज्यपालांच्या विमान प्रवासावरून गोंधळ उडालेला असताना मुख्यमंत्री सचिवालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यायला हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. तसेच विमान उड्डाणाला परवानगी नसल्याचा संदेश आदल्या दिवशीच पाठवण्यात आला होता, असे सचिवालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

Previous article“ज्याचे डिपॉझिट कुणी ठेवत नाही,त्याची काय एवढी नोंद घेता” – अजित पवार
Next articleबंद दाराआड काय चर्चा झाली ते आताच सांगून टाकतो – मुख्यमंत्री