पूजा चव्हाण संशयित मृत्यूप्रकरणी सरकार जनतेला माहिती का देत नाही ? प्रविण दरेकरांचा सवाल

मुंबई नगरी टीम

  • अरुण राठोडला बेपत्ता कोण करू शकतो
  • सहाव्या मजल्याच्या दबावामुळे पोलीस तपास प्रभावित झाला आहे का
  • दरेकरांनी उपस्थित केले प्रश्न

मुंबई । पूजा चव्हाण संशयित मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा गृहमंत्री अनिल देशमुख किंवा पोलीस महासंचालक जनतेला माहिती का देत नाहीत,असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.त्यांनी आज पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली.

७ फेब्रुवारी, रोजी परळीतील युवती पूजा चव्हाण हिचा पुणे येथे संशयास्पद मृत्यू झाला. याच प्रकरणातील काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या असून पूजा चव्हाण मृत्यूबाबत संशयाचे वातावरण निर्माण करणाऱ्या गोष्टी घडल्या आहेत.विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही केली आहे.गेल्या १७ दिवसात संशय निर्माण करणाऱ्या अनेक घटना घडल्यामुळे लोकांच्या मनात चौकशीबाबत संभ्रम निर्माण झाला असताना तपासाबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती जनतेला दिलेली नाही.यामुळे जनतेत विशेषतः महिलांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. विरोधी पक्ष नेता म्हणून माझ्या आणि जनतेच्या मनातील प्रश्न मांडण्यासाठी मी आज राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली व या प्रश्नांबाबत जनतेला अवगत करावे,अशी त्यांच्याकडे मागणी केल्याची माहिती प्रविण दरेकरांनी पोलीस महासंचालकांना भेटून आल्यानंतर प्रसार माध्यमांना दिली.

पूजा चव्हाण संशयित मृत्यूप्रकरणी दरेकरांनी पोलीस महासंचालकांना दिलेल्या पत्रात १४ प्रश्न उपस्थित केले आहेत. पूजा चव्हाण प्रकरणात आवाज उठवत असल्याने भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांना वारंवार व्हिडीओ आणि फोनद्वारे धमक्या येत असल्याची बाबही पोलीस महासंचालकांच्या कानावर घातली असून याप्रकरणी देखील तातडीने कारवाई करावी,अशी मागणी त्यांच्याकडे केल्याची माहितीही दरेकरांनी दिली.

विरोधी पक्षनेते दरेकरांनी उपस्थित केले हे प्रश्न

१. ७ फेब्रुवारीपासून २४ फेब्रुवारीपर्यंत १७ दिवस प्रमुख साक्षीदार, या घटनेतील महत्वाचा दुवा अरुण राठोड बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस काय प्रयत्न करीत आहेत ?
२. अरुण राठोडला बेपत्ता कोण करू शकतो,याबाबत काही व्यक्ती संशयाच्या फेऱ्यात असताना पोलिसांनी आतापर्यंत त्यांची चौकशी का केली नाही ?
३. अरुण राठोडचे नातेवाईक सुद्धा त्यांच्या गावातून बेपत्ता आहेत, अरुण राठोड व त्याच्या कुटुंबाचे काही बरेवाईट झाले किंवा कसे, अशी भीती जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. १७ दिवसात त्यांचाही शोध घेण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. याबाबत पोलीस नेमकी काय कार्यवाही करीत आहेत ?
४. अरुण राठोडच्या मूळ गावी असलेल्या घरात चोरी झाली असून याची चौकशी पोलिसांनी केली आहे का ?
५. घटना घडून आणि ऑडिओ क्लिप उघड होऊन १७ दिवस झाले. पोलिसांनी कुणाची चौकशी केली,केली की नाही, प्रमुख संशयित,ज्यांचा आवाज या क्लिपमध्ये आहे, त्यांची चौकशी पोलिसांनी का केली नाही
६. मृत पुजा चव्हाणचे कुटुंबीय प्रचंड दबावाखाली व असुरक्षित आहेत. “महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्यक्रम”, असा जयघोष करणारे सरकार त्यांना सुरक्षितता देणार का ?
७. अरुण राठोड व एक महिला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी दाखल झाले होते, त्या महिलेच्या नावाची नोंद पूजा चव्हाण या नावाशी मिळतीजुळती आहे. याचाही पोलीस तपासात फायदा होणार आहे. पोलिसांनी याबाबत चौकशी केली आहे का ?
८. व्हिडीओ क्लिपमध्ये ज्यांचा आवाज आहे, ज्यांच्याबद्दल पूजाच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे, त्या मंत्रीमंडळातील संबंधित मंत्र्यांची चौकशी तातडीने करणे गरजेचे असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष पोलिसांकडून का केले गेले ?
९. खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी करोनाच्या काळजीपोटी यात्रा, सभा, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे, जनसामान्य त्याचे पालन करीत आहेत, कोरोना विषयक खबरदारी पाळली नाही तर लॉकडाऊन करू अशी धमकी मुख्यमंत्री जनतेला देत आहेत, साधी मुखपट्टी नसेल तर २००० रुपयांचा दंड सामान्यांकडून मुख्यमंत्री वसूल करतात. मग १७ दिवस लपून बसलेले मंत्रिमंडळातील एक मंत्री पोहरादेवी येथे शक्ती प्रदर्शन करतात, लाखोंचा जमाव जमवतात, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवतात, त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे का किंवा मुख्यमंत्री त्यांना कोणता दंड करणार आहेत
१०. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याच्या दबावामुळे पोलीस तपास प्रभावित झाला आहे का ?
११. संशयित मंत्री यांच्यापर्यंत १७ दिवस झाले पोलीस पोहोचले नाहीत, पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केल्याचा संशय जनतेच्या मनात आहे, याबाबत वस्तुस्थिती काय आहे ?
१२. मंत्रिमंडळातील मंत्री १५ दिवस गायब होतो, ते कुठे आहेत, का लपले आहेत, याची चौकशी मुख्यमंत्री म्हणून आपण केली का, असेल तर त्याची माहिती आपण जनतेला देणार का ?
१३. या प्रकरणात मुख्यमंत्री, गृह मंत्री आणि पोलीस महासंचालक माध्यमांना का टाळत आहेत, जनतेला माहिती का देत नाहीत ?
१४. विरोधी पक्ष नेता म्हणून मला, महाराष्ट्रातील जनतेला या प्रश्नांची उत्तरं हवीत, मुख्यमंत्री महोदय, गृह मंत्री महोदय किंवा पोलीस महासंचालक या प्रश्नांची उत्तरं देतील का ?

Previous articleमहानगरपालिका निवडणूका स्वबळावर लढण्यास तयार रहा ! नाना पटोलेंच्या सूचना
Next articleसंजय राठोडांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण; मंत्रिमंडळ बैठकीत काय झाली चर्चा!