महानगरपालिका निवडणूका स्वबळावर लढण्यास तयार रहा ! नाना पटोलेंच्या सूचना

मुंबई नगरी टीम

  • नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार व ठाणे जिल्ह्याचा आढावा
  • काँग्रेस पक्षाला विजयी करण्यासाठी कामाला लागा
  • राज्यात काँग्रेस पक्षाला अनुकुल वातावरण

मुंबई । राज्यातील आगामी महानगरपालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वांनी एकदिलाने काम करून काँग्रेस पक्षाला विजयी करण्यासाठी कामाला लागा असे आवाहन करतानाच पक्ष संघटना बळकट करण्यासाठी मायक्रो लेवलला काम करा आणि स्वबळावर लढण्यास तयार रहा अशा सूचना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्या आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार व ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या बैठका घेऊन निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान,बसवराज पाटील, आ. कुणाल पाटील,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी बी.एम. संदीप,महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे,सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, माणिकराव जगताप, मोहन जोशी, माजी आ. मधू चव्हाण डॉ. संजय लाखे पाटील, देवानंद पवार आदी उपस्थित होते.

नाना पटोले पुढे म्हणाले की, सध्या राज्यात काँग्रेस पक्षाला अनुकुल वातावरण असून काँग्रेस पक्षाला मानणारे लोकही मोठ्या संख्येने आहेत, कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी मायक्रो लेवलला काम करा आणि स्वबळावर लढण्यास तयार रहा. महापालिका निवडणुकीत वार्डनिहाय जबाबदारी दिली जाईल त्यानुसार काम करून पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणा.कल्याण डोंबिवलीचा आढावा घेताना प्रतांध्यक्षांनी सर्व पदाधिकाऱ्यांची नावे घेऊन उपस्थित आहेत का हे पाहिले. काँग्रेसचे सैनिक म्हणून काम करा. पक्षाचे सर्व सेल, विभाग, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल, एनएसयुआयच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेणे गरजेचे आहे त्यांना सोबत घ्या. काँग्रेस पक्षात सर्व समाज घटकाला न्याय देण्याची भूमिका राहिली आहे. चांगले काम केले तर आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष यांनी व्यक्त केला. या आढावा बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी काही अडचणी मांडल्या व काही सुचनाही केल्या. प्रदेशाध्यक्षांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन पक्ष त्यांना सोबत असल्याचा विश्वास दिला.

Previous articleनारायण राणेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका; काय म्हणाले राणे ?
Next articleपूजा चव्हाण संशयित मृत्यूप्रकरणी सरकार जनतेला माहिती का देत नाही ? प्रविण दरेकरांचा सवाल