नारायण राणेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका; काय म्हणाले राणे ?

मुंबई नगरी टीम

  • महाविकास आघाडीचे शरद पवार यांच्या कृपेमुळे
  • उद्धव ठाकरेंचं कोणीही ऐकत नाही
  • सरकार आरोपींना पाठिशी घालतंय

सिंधुदुर्ग । भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कृपेमुळे असल्याचे सांगतानाच संजय राठोड प्रकरणी राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे शरद पवार यांच्या कृपेमुळे असून त्यामुळेच ठाकरे यांना मुख्यमंत्री केले आहे नाही तर असा मुख्यमंत्री कोणी केला असता असा टोला लगावतानाच,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोणीही कोणीही ऐकत नसल्यानेच महाराष्ट्राची अशी अवस्था झाली असल्याची टीका राणे यांनी केली आहे. एखाद्या मंत्र्यावर कारवाई केली तर हातात असलेले लोकही पळतील अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्र्यावर प्रहार केला.मुख्यमंत्री केवळ घरात बसून बोलतात,ते लोकांसमोर येऊन बोलत नाही.एवढेच नव्हे तर ते मंत्रालयात सुद्धा येत नाहीत.राणे यांनी यावेळी संजय राठोड प्रकरणावरही भाष्य केले.सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत गर्दी करू नका असे सांगतात मात्र त्यांचेच मंत्री हजारोची गर्दी जमवतात अशा संजय राठोडवर काय कारवाई केली असा सवालही त्यांनी केला.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ऑडिओ क्लिप बाहेर आली. त्यातील आवाज कोणाचा आहे. संभाषण कोणाचे आहे. तिला डॉक्टरकडे ने, हे कर ते कर,असे सांगणारा आवाज कोणाचा आहे ? या प्रकरणानंतर १५ दिवसांनंतर मंत्री संजय राठोड लोकांसमोर येवून भाजप कुटुंब उद्धवस्त करायला निघाले असा आरोप करतात.पूजा चव्हाण यांनी आत्महत्या केली की त्यांचा खून झाला हे समोर आलेले नाही. पण राठोड आणि पूजा यांच्या ऑडिओ क्लिप समोर आल्या आहेत.या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव घेतले जात होते.त्यानंतर ते पंधरा दिवसांनी थेट मंदिरात गेले असे सांगून,मंदिरात जायला ते काय संत आहेत का असा सवाल राणे यांनी करून या क्लिपमधिल आवाज खरा आहे की खोटा आहे हे आधी सरकारने सांगावे अशी मागणी करतानाच, सरकार विनयभंग, बलात्कार आणि खून करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला.एवढेच काय सरकार सुशांत सिंग, दिशा सालियान, पूजा केस या सर्व प्रकरणात सरकार आरोपींना पाठिशी घालत आहे. या सरकारला पाठीशी घालण्याचे लायसन्स दिले आहे का ? असा सवालही राणे यांनी केला.या राज्यातील कोणताही सरपंच या मुख्यमंत्र्यांपेक्षा किती तरी हुशार आणि कायद्याची माहिती असलेला आहे, अशी टीका राणेंनी केली.

Previous articleखा.मोहन डेलकरांच्या सुसाईड नोट मध्ये भाजपच्या बड्या नेत्याचे नाव : काँग्रेसचा गौप्सस्फोट
Next articleमहानगरपालिका निवडणूका स्वबळावर लढण्यास तयार रहा ! नाना पटोलेंच्या सूचना