मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून,अधिवेशनाच्या दुस-या दिवशी भाजपचे आमदार डॅा. संदीप धुर्वे यांनी आपल्या मागणीसाठी विधानसभेच्या गॅलरीतून उडी मारतो,अशी धमकी देत गॅलरीच्या कठड्यापर्यंत येऊन त्यासाठी केलेल्या प्रकारामुळे सभागृह चांगलेच हादरले.
आज विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात अर्णीचे भाजपचे आमदार डॅा. संदीप धुर्वे यांनी अर्णी नगरपरिषदेमध्ये बांधकाम अभियंता आमि कंत्राटदार यांनी संगनमत करून मान्सून पूर्व कामात लाखोंचा गैरव्यवहार केल्याची तक्रार नगरसेवकाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्याचा मुद्दा उपस्थित करून संबंधित अधिका-याला निलंबित करण्याची मागणी केली. यावर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले मात्र मंत्री शिंदे यांच्या आश्वासनाने समाधान न झाल्याने भाजपचे आमदार डॅा. संदीप धुर्वे यांनी संबंधित अधिका-याला निलंबित करा नाही तर विधानसभा गॅलरीतून उडी मारतो,अशी धमकी देत गॅलरीच्या कठड्यापर्यंत येऊन त्यासाठी प्रयत्न केला.भाजपच्या या आमदाराने उडी मारण्याचा केलेल्या प्रयत्नामुळे मात्र सभागृह चांगलेच हादरले.
अर्णी नगरपरिषदेचा तारांकित प्रश्न आमदार संदीप धुर्वे यांनी मांडल्यावर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे आर्णी नगरपरिषदेतील प्रश्नावर उत्तर सुरू केले.तर त्याचेवेळी दुसरीकडे आमदार संदीप धुर्वे यांनी माझे म्हणणे ऐकून घ्या,नाहीतर गॅलरीतून उडी मारेन, अशी धमकी दिली.ते धमकी देण्यावर थांबले नाही तर आपल्या आसनापासून पुढे धावत गेले.धुर्वे उडी मारण्यासाठी सभागृह गॅलरीच्या कठड्यापर्यंत आले.यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या अन्य भाजप आमदारांनी त्यांना या प्रकारापासून परावृत्त करायचे सोडून उलट धुर्वे यांना त्यासाठी प्रोत्साहनच दिले.या प्रकारमुळे संतप्त झालेले उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी तुमच्या प्रतिनिधीला शांत करा अशा सूचना भाजप नेत्यांना यावेळी दिल्या.ही सभागृहाची शिस्त आहे का,याला सभागृह म्हणतात का ? काय चाललंय सभागृहात,असा सवाल काँग्रेस सदस्य नाना पटोले यांनी करीत अशा आमदारांवर कारवाई का करा,अशी मागणी केली.तर धुर्वे हे उडी मारण्याचा प्रयत्न करीत आहेत,आत्महत्या करणे हा गुन्हा आहे.त्यामुळे धुर्वे यांच्यावर कारवाई करणार का ? असा सवाल संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी केला.सभागृहात झालेल्या या गदारोळावर अखेर आमदार धुर्वे यांना स्पष्टीकरण द्यावे लागले.मी केवळ अर्णी नगर परिषदेच्या गैरव्यवहार प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती.मात्र मी उडी मारणार नव्हतो. आपले लक्ष वेधण्यासाठी मी आवाज देत होतो, अशी सारवासारव आमदार धुर्वे यांनी केल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.