अखेर सक्तीच्या वीज बिल वसुलीस स्थगिती ; अजित पवारांचे आदेश

मुंबई नगरी टीम

मुंबई । कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांना आलेल्या वाढीव वीज बिलामुळे कंबरडे मोडले असतानाच थकबाकीदरांचे वीज जोडणी तोडण्याच्या नोटीसा दिल्याने हवालदिल झालेल्यांना दिलासा मिळाला आहे.शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी तोडू नये, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिले.

वाढते वीज बिल आणि वीज जोडणी तोडण्याच्या दिलेल्या नोटीसांसदर्भात विरोधकांनी आज विधानभवनाच्या पाय-यांवर आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले.सभागृहाचे कामकाज सुरू होताच विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हा मुद्दा उपस्थित केला.सर्व कामकाज बाजूला ठेवून या विषयावर चर्चा करण्याची मागणी फडणवीसांनी लावून धरली.राज्यातील शेतकरी,नागरिकांच्या वीज जोडणी कापण्याचा सपाटा महाविकास आघाडी सरकारने लावला असल्याने आधीच अडचणीत संकटात असलेला गरीब आणि मध्यमवर्गीय प्रचंड त्रस्त असल्याने विज जोडण्या तोडणे थांबविण्याची मागणी त्यांनी केली.विधानपरिषदेत प्रविण दरेकर यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेवर बोलताना सरकारला धारेवर धरत भरमसाठ बिल आल्याचे सांगून ही बिले सभागृहात दाखवली. बिल्डरांना ६ ते ७ हजार कोटी रुपयांचा प्रिमियम माफ करणारे सरकार,दारु दुकानदारांची फी माफ करणारे सरकार महसूल मिळत नाही,हे कारण पुढे करीत आहे. त्याऐवजी शेतकऱ्यांसाठी चार-पाच हजार कोटी लागणार असतील तर सरकार हा धाडसी निर्णय का घेत नाही, असा जाबही त्यांनी सरकारचा विचारला.

शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी तोडू नये,असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.पवार यांच्या निर्देशानंतर संबंधित यंत्रणांना वीज तोडणी तात्काळ थांबवण्यास सांगण्यात आले आहे.पवार म्हणाले की,वीजबिलांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे.चर्चा होऊन दोन्ही बाजूच्या सभासदांचे समाधान होईपर्यंत राज्यातील कृषीपंप आणि ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यात येणार नाही.राज्यातील वीजथकबाकीसंदर्भात विशेष बैठक आयोजित करुन चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचे पवार यांनी सांगितले.पवार यांच्या या निर्देशाबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पवार यांचे आभार मानून ज्यांच्या विज जोडण्या तोडल्या आहेत अशांची विज पुन्हा जोडून देण्याची मागणी केली.

Previous articleकोरोना होता मग सांगली महापालिकेची निवडणुक कशी घेतली : चंद्रकांत पाटलांचा सवाल
Next articleबापरे…भाजपच्या आमदाराने विधानसभा गॅलरीतून उडी मारण्याचा केला प्रयत्न