मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यात घडणाऱ्या घटना या चिंताजनक असून,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे या प्रकरणातील मौन हे सर्वात चिंताजनक आणि घातक आहे.या प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोनदा पत्रकार परिषदा घेऊन संबंधितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, राज्यात काँग्रेसचे अस्तित्वातच नसल्यासारखे आहे.दिल्लीतील नेते वेगळे बोलतात तर राज्यातले नेते वेगळे बोलतात हे केवळ सत्तेसाठी सगळे एकत्र आहेत बाकी काही नाही,असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावतानाच काँग्रेसला यातील किती हिस्सा किंवा वाटा आहे, असा सवालही त्यांनी केला.
भाजपाच्या शिष्टमंडळाने आज राज्यातील घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेवून,फोन टॅपिंग प्रकरणात राज्यपालांनी हस्ताक्षेप करावा अशी मागणी भाजपाच्या शिष्टमंडळाने केली.या भेटीनंतर विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी राज्य सरकार आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला.या प्रकरणी मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलते केले पाहिजे असे फडणवीस म्हणाले.बदली रॅकेट प्रकरणी राज्य सरकारने काय कारवाई केली,याचा अहवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून मागवावा अशी मागणीही फडणवीस यांनी केली.मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असल्याने त्यांनी यावर बोलले पाहिजे.मात्र त्यांना माहिती आहे की या मुद्द्यावर बोलणे कठीण आहे. पण त्यांना माहिती आहे की यावर बोलले तर याची चौकशी करावी लागेल.असे सांगून त्यांना त्यांची चौकशी करायची नाही. सरकारला वाचवण्यासाठी हे सर्व सुरु आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
फडणवीस यांनी यावेळी काँग्रेसला लक्ष केले.राज्यात काँग्रेसचे अस्तित्वातच नसल्यासारखे आहे.दिल्लीतील नेते वेगळे बोलतात तर राज्यातले नेते वेगळे बोलतात हे केवळ सत्तेसाठी सगळे एकत्र आहेत बाकी काही नाही,असा टोला फडणवीस यांनी लगावतानाच काँग्रेसला यातील किती हिस्सा किंवा वाटा आहे असे सवाल केला.संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की,राऊत यांच्याकडे खूप वेळ असून त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याइतके ते मोठे नेते नाहीत.काल जो अहवाल दिला तो लवंगी फटका होता की मोठा बॉम्ब, हे लवकरच समोर येईल. जर तो लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले असा सवालही त्यांनी उपस्थित केला.राज्यपाल हे संविधानानुसार प्रमुख आहेत म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. आम्ही गेलो की ते भाजपाचे नेते असतात आणि तुम्ही कमरेमध्ये वाकून त्यांना नमस्कार करता तेव्हा ते कोणाचे नेते असतात ?, असा टोलाही त्यांनी राऊत यांना लगावला.