रत्नागिरी येथे नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास मंजुरी :उदय सामंतांची वचनपूर्ती

मुंबई नगरी टीम

मुंबई । यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून रत्नागिरी येथे नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असून,राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोकणातून दर्जात्मक अभियंते तयार होतील,असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रत्नागिरी येथे नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास आणि शिक्षक व कर्मचा-यांची पदे भरण्यास मंजुरी दिली आहे.रत्नागिरीतील हे नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येणार आहे.या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅट्रानिक्स इंजिनिअरिंग, सिव्हिल व इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग, आर्टिफिशिअल इंटेलिजेंन्स व डेटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि फूड टेक्नॉलॉजी व मॅनेजमेंट हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.१५२.५३ कोटी खर्च करून ३०० प्रवेश क्षमतेचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

रत्नागिरीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होत असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच समकालीन स्पर्धात्मक काळाशी अनुरूप असे अभ्यासक्रम यामध्ये असल्याकारणाने विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतांना न्याय देता येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थी जागतिक स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. विशेषतः शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आपल्या भागात सुरू होत असल्याचा कोकणवासीयांना आनंद झाल्याची भावना सामंत यांनी यावेळी व्यक्त केली आहे.तर रत्नागिरीत होत असलेल्या या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामुळे रत्नागिरीचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कोकणवासीयांची वचनपूर्ती केली आहे.

Previous articleवसुलीमधील काँग्रेसला किती हिस्सा किंवा वाटा ? फडणवीसांचा काँग्रेसला सवाल
Next articleमहसुली विभागांत अधिकाऱ्यांची रिक्त पदे समप्रमाणात भरणार