मुंबई नगरी टीम
मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने विधानपरिषद सदस्य नेमणूक करण्यासाठी ज्या १२ जणांच्या नावावर शिक्कामोर्तब करून यादी मंजूरीसाठी राज्यपालाकडे पाठविली होती ती यादी माहिती अधिकारात उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिली होती.उद्या मंगळवारी १५ जून रोजी राजभवन सचिवालयात याबाबत अनिल गलगली यांनी दिलेल्या आव्हान अपिलावर सुनावणी होणार आहे.त्यामुळे ही यादी नक्की कुठे आहे हे उद्या स्पष्ट होणार आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे दिनांक २२ एप्रिल २०२१ रोजी माहिती विचारली होती की, मुख्यमंत्री,मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवर सदस्य नेमणुकीबाबत राज्यपालांना सादर केलेली १२ जणांच्या नावाची यादी देण्यात यावी.तसेच मुख्यमंत्री,मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवर सदस्य नेमणुकीबाबत राज्यपालांकडे सादर केलेल्या प्रस्तावाची सद्यस्थितीची माहिती देण्यात यावी. गलगली यांच्या अर्जावर १९ मे २०२१ रोजी राज्यपाल सचिवालयाचे अवर सचिव जयराज चौधरी यांनी उत्तर देत कळविले की,राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांची यादी जन माहिती अधिकारी ( प्रशासन) यांच्या कार्यालयात उपलब्ध नसल्याने, आपणांस उपलब्ध करुन देता येत नाही.गलगली यांनी संभ्रमित करणाऱ्या या माहिती बाबत प्रथम अपील दाखल केले असून उद्या मंगळवारी,१५ जून रोजी या अपीलावर सुनावणी होणार आहे.या यादीबाबत राज्यपालाच्या उप सचिव प्राची जांभेकर या सुनावणी घेत निर्णय देणार असल्याने महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी राज्यपालांकडे मंजूरीसाठी दिलेली यादी नक्की कुठे आहे याचा फैसला होणार आहे.