मुंबई नगरी टीम
मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक उद्या मंगळवारी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत होत असून या बैठकीनंतर इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या या बैठकीला सर्व निमंत्रित सदस्य आणि कायम सदस्य सहभागी होणार आहेत.या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.या बैठकीनंतर शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.या बैठकीला आम आदमी पार्टी,तृणमूल काँग्रेस, आरजेडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत असेही मलिक म्हणाले. आगामी लोकसभेच्या अधिवेशनाबाबत यामध्ये चर्चा होणार आहे.शिवाय देशातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा केली जाणार असून,संपूर्ण देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम आजपासून पवार करणार असल्याचेही मलिक म्हणाले.राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मुंबईत पवार यांची भेट घेतली होती आज त्यांनी पुन्हा पवार यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.या भेटीत त्यांनी देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती दिल्याचे मलिक यांनी सांगितले.उद्या काही मोजक्या पक्षांसोबत चर्चा होणार असून त्यानंतर इतर पक्षांना कसे एकत्र आणता येईल त्याबाबतीत हे नेते या बैठकीत रणनिती ठरवणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.
भाजप दररोज सरकार येईल या आशेवर नवनवीन विषय समोर आणून राज्यातील महाविकास आघाडी सरकार जाणार असल्याचे सांगत आहे.परंतु हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला.महाविकास आघाडीचे सरकार लवकरच कोसळणार ही भाजपने जाहीर केलेली एकही भविष्यवाणी किंवा तारीख खरी ठरत नाही असा टोलाही मलिक यांनी भाजपला लगावला आहे.महाविकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर बनवण्यात आले आहे.सरकार जनहिताची कामे करत आहे. आणि सरकारच्या कामकाजावर जनता समाधानी आहे त्यामुळे हे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल असेही मलिक यांनी स्पष्ट केले.