मुंबई नगरी टीम
मुंबई । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर खनिकर्म महामंडळ व महाजनको यांच्या दरम्यान कोळसा पुरवठा व स्वच्छ करण्यासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.खनिकर्म महामंडळातील या निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी नागपूरच्या विभागीय आयुक्तांची एकसदस्यिय समिती गठित करण्यात आली असून या समितीला एक महिन्याच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर खनिकर्म महामंडळ व महाजनको यांच्या दरम्यान कोळसा पुरवठा व स्वच्छ करण्यासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या तक्रारीची देसाई यांनी तत्काळ दखल घेऊन उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह यांना पुढील कारवाईचे निर्देश दिले.त्यानुसार शासनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी नागपुरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांची एकसदस्यिय समिती गठित केली आहे.या समितील एक महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या संदर्भातील शासन आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
दरम्यान, महाजनको आणि नागपूर खनिकर्म महामंडळ यांच्यात ही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. प्रक्रियेशी राज्य शासनाचा थेट संबंध नसल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.