कर नाही तर डर कशाला..१०० वेळा कुठल्याही चौकशीला सामोरे जाईन

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही. मुंबई बॅंक अडचणीत नसून बॅंकेची आर्थिक स्थिती उत्तम आहे.केवळ साप साप म्हणायचे आणि भुई थोपटण्याचा हा राजकीय विरोधकांचा प्रयत्न आहे.केवळ राजकीय सुडापोटी व राजकीय प्लॅनिंग करुन विरोधी पक्ष नेता या नात्याने आणि बॅंकेची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.कर नाही त्याला डर कशाला…मी कुठल्याही चौकशीला घाबरत नाही,त्यामुळे माझी एकदाच काय पण १०० वेळा चौकशीला सामोरे जाण्याची तयार आहे असे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँकेचे अध्यक्ष व विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज ठणकावून सांगितले.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँकेच्या संदर्भात काही प्रसिध्दी माध्यमांमध्ये चुकीच्या व दिशाभूल करणा-या बातम्या प्रसारीत होत आहेत. मुंबई बॅंकेचे सभासद,ठेवीदार व बॅंकेचे सभासद यामध्ये विनाकारण संभ्रमाचे व भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही प्रसिध्दी माध्यमांकडून होत आहे. त्यामुळे मुंबई बॅंकेच्या कामाची वस्तुस्थिती मांडण्यासाठी बॅंकेचे अध्यक्ष व विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.यावेळी मुंबई बँकेच्या कथित घोटाळ्यासंदर्भात विरोधकांकडून होणा-या आरोपांना दरेकर यांनी आज चोख प्रत्युत्तर दिले आहे.यावेळी मुंबई बँकेचे मोठया संख्येने संचालक उपस्थित होते.मुंबई बॅंकेत १२३ रुपयांचा घोटाळा विषयात १२३ चा आकडा कुठून आला, हा संशोधनाचा विषय आहे. मुंबई बॅंकेच्या विरोधात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिका ५ वेळा न्यायायलायने फेटाळल्या असल्याचे स्पष्ट करतानाच दरेकर यांनी विरोधकांचे आरोप खोटे ठरवित सर्व मुद्दे खोडून काढले.

राजा नलावडे यांची नियुक्ती नियानुसारच

राजा नलावडे यांची नियुक्ती सर्व पात्रता,निकष तपासून तसेच संचालक मंडळास असलेल्या अधिकारांनुसार करण्यात आली. बॅंकेतील अधिकारी,कर्मचारी यांच्या नियुक्तीचे अधिकार अध्यक्ष अथवा वैयक्तिक संचालकांना नसून बॅंकेच्या संचालक मंडळाला आहेत.

रोखे विक्री आरबीआयच्या मार्गदर्शत तत्वानुसारच

जानेवारी ते मार्च २००७ या दरम्यान गुंतवणूक केलेल्या सरकारी रोख्यांची विक्री संचालक मंडळाने गुंतवणूक धोरणातील तरतुदींनुसार व रिझर्व्ह बॅंकेच्या मार्गदर्शक तत्वानुसारच केली आहे. त्यामुळे या निर्णयामुळे ६.६० कोटीचे नुकसान झाले हा दावा चुकीचा आहे. या निर्णयाला रिझर्व्ह बॅंक तसेच नाबार्ड यांनीही तपासणी अहवालात आक्षेप घेतलेला नाही.

कर्मचारी ओव्हरड्राफ्ट नियमानुसारच

बॅंकेने कर्मचार-यांच्या सोयीसाठी ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेसंदर्भात राजा नलावडे व अन्य कर्मचारी यांच्यातील व्यवहार हा बॅंकिग नियमानुसारच झालेला आहे. व नलावडे यांच्याकडे १ रुपयाही प्रलंबित नाही.

मध्य प्रदेश औद्योगिक विकास महामंडळातील गुंतवणूक नियमानुसार

बॅंकेने १९९८-९९ मध्ये एमपीएसआयडीसीकडे ११० कोटी रुपयांची गुंतवणूक ३ वर्षांसाठी मुदत ठेवीमध्ये केली होती. या गुंतवणुकीला त्यावेळी १६ टक्के व्याजदर होता. या गुंतवणूकीस रिझर्व्ह बॅंकेने रु.५० कोटीसाठी गुंतवणुकोत्तर परवानगी दिली होती. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने रु. ५० कोटींसाठी मंजुरी दिली होती व उर्वरित १० कोटी अल्पमुदतीसाठी असल्याने विकास महामंडळाने त्याची परतफेड केली. या गुंतवणुकीवर बॅंकेला ५७ कोटी रुपये व्याज मिळाले. ३१ मार्च २०१९ अखेर बॅंकेस मुद्दल ठेवी पोटी ११० कोटी व व्याजापोटी ४६ कोटी मिळाले.

मजूर संस्था सभासदत्व योग्यच

मजूर सहकारी संस्थांना सभासदत्व देताना बॅंकेच्या उपविधीतील तरतुदीनुसारच आवश्यक पूर्तता करण्यात आली. बॅंकेच्या संचालक मंडळ सभेमध्ये ठराव झाल्यानंतरच त्यांच्या सभासदत्वाला मान्यता देण्यात येते. हे सभासदत्व अध्यक्ष या नात्याने देण्यात येत नाही.

डिझास्टर रिकव्हरी साईट

बॅंकिग क्षेत्रात कोअर बॅंकिग प्रणाली अनिवार्य असल्यामुळे जून २०१२ मध्ये नाशिक येथे डिझास्टर रिकव्हरी साईट प्रस्थापित केली. यामुळे फोर्ट येथील डाटा सेंटरमध्ये ब्रेक डाऊन झाल्यास त्या साईट वरील उपलब्ध डाटा घेऊन सेंटरची कार्यप्रणाली सुरु करता येते. ही साईट टायर-थ्री शहरात असणे अपेक्षित असल्यामुळे ही साईट टायर थ्री श्रेणीतील नाशिकमध्ये हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.

बॅंकेची आर्थिक स्थिती उत्तम

बॅंकेची आर्थिक स्थिती अतिशय उत्तम असून कामकाजही बॅंकिंग नियमानुसार अतिशय कार्यक्षमतेने सुरु आहे. तसेच वैधानिक लेखा परिरक्षामध्येही बॅंकेला अ वर्ग मिळाला असून बॅंकेच्या एकूण कारभारावर उमटलेली ही अधिकृत मान्यता आहे. दरेकर यांनी बॅंकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून सातत्याने लेखापरिक्षामध्ये अ दर्जा कायम ठेवला. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या शेवटी ८.१३ कोटींचा नफा असल्यामुळे ठेवींमध्ये २२०० कोटींनी वाढ झाली.

जनसामान्यांचा आवाज उठवणारा व जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारा विधान परिषद विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर आता कुठे गायब झाला असा आरोप होत आहे, पण मी कुठेही गेलेलो नाही. विरोधी पक्षनेता असल्यानं माझ्यावर दबाव आणून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण आपल्याला जेवढे अडचणीत आणाल तेवढा जास्त मी आक्रमकपणे जनतेचे प्रश्न मांडत राहिल असेही दरेकर यांनी ठामपणे सांगितले. माझ्यावरील व बॅंकेवरील आरोप खोडसाळपणे केले जात आहेत. केवळ राजकीय सुडपोटी आरोप करण्यात आले आहेत. माझ्या मतदारसंघातील आमदार व राजकीय प्रतिस्पर्धी प्रकाश सुर्वे यांचे पार्टनर पंकज कोटेजा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रानुसार जाणीवपूर्क चौकशी लावून आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमदार प्रकाश सुर्वेही राजकीय सुडापोटी आरोप करत आहेत पण त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.
काही प्रसारमाध्यमांवरुन मुंबई बॅंकेबद्दल चुकीची बातमी प्रसारित करुन माझी व बॅंकेची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे त्या प्रसारमाध्यमांवर अब्रूनुकसानीचा खटला दाखल करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून त्यासंदर्भात संबधित प्रसारमाध्यमांना नोटीस देणार आल्याची माहितीही दरेकर यांनी दिली.जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची राज्य सहकारी बॅंकेच्या माध्यमातून अवैध रितीने खरेदी करणे आणि मनी लॉंडिरिंग आरोपावरून ईडीने कंपनीची ६५ कोटीची मालमत्ता जप्तीची कारवाई केली, त्या साखर कारखान्याकडे मुंबई बॅंकेची १८ कोटीची थकबाकी आहे असेही स्पष्ट करतानाच दरेकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी मुंबई बॅंकेच्या व्यवहाराची चौकशीचे आदेश देण्याएवजी राज्य सहकरी बॅंकेच्या मार्फत होणा-या कवडीमोल लिलावाची चौकशी करण्याचे आदेश तातडीने द्यावेत.

बॅंकेचा विधीमंडळातही गौरव

विधीमंडळ सभागृहात सन २०१४ मध्ये कॉंग्रेसच्या काळात कॉंग्रेसचे सहकार मंत्र्यांनी मुंबई बॅंकेच्या कामाची तसेच बॅंकेच्या अध्यक्षांचा व त्यांच्या कार्यपध्दीचा गौरव केला होता. त्यांच्या कारकीर्दीत बॅंकेची प्रगती चागंली झाली असेही सहकार मंत्र्यांनी नमुद केले होते. त्याप्रमाणे डिसेंबर २०१० मध्येही तत्कालिन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुंबई बॅंकेच्या व बॅंकेचे अध्यक्षांच्या कार्यपध्दीचे कौतुक केले होते, याचे स्मरणही दरेकर यांनी आज करुन दिले.

Previous articleनाना पटोले यांनी केलेल्या तक्रारीची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी होणार
Next articleखुशखबर : आता पोलीस शिपाई निवृत्त होताना पोलीस उपनिरिक्षक पदापर्यंत पोहचणार