मुंबई नगरी टीम
मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हुबेहुब आवाज काढून एका व्यक्तीने बदलीसाठी मुख्यमंत्री कार्यालयात फोन केल्याने एकच खळबळ उडाली आहे.मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना याबाबत शंका आल्याने त्यांनी गावदेवी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी एक व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.हे प्रकरण अत्यंत गंभीर असून लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करीत, हा प्रकार राज्याच्या हितासाठी योग्य नसून असे काही घडल्यास राज्य सरकारला भविष्यात अनेक गंभीर प्रसंगांना सामोरे जावे लागेल अशी भीती विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली.
सध्या बदल्यांचा काळ सुरू असून,एका अधिका-याच्या बदलीसाठी एका व्यक्तीने चक्क राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हुबेहुब आवाज काढत थेट मुख्यमंत्री कार्यालयात फोन करून एका अधिका-याची बदली करण्याचे फर्मान सोडल्याने एकच खळबळ उडाली आहे.हा प्रकार काल घडला असल्याचे समजते.या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना फोन करून, मी शरद पवार बोलत असल्याचे सांगून एका अधिकाऱ्याची एका विशिष्ठ ठिकाणी बदली करावी असे सांगितले.मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना याबाबत शंका आल्याने त्यांनी हा प्रकार थेट शरद पवारांनाच्या कानी घातला.या प्रकारमुळे पवार हेही आश्चर्यचकित झाले.पवार यांच्या या भेटीनंतर पवार यांचा हुबेहूब आवाज काढून संबंधित व्यक्ती अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे उघड झाले.हा फोन बनावट व्यक्तीने केल्याचे समजताच गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानेही सुरू करून एका संशयित व्यक्तीस ताब्यात घेतले आहे.
शरद पवार यांच्या आवाजात फोन करुन दुरुपयोग केल्याच्या प्रकरणाची चौकशी करावी
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजात फोन करून दुरुपयोग करणं हे अत्यंत निंदनीय आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. हा प्रकार राज्याच्या हितासाठी योग्य नसून असे काही घडल्यास राज्य सरकारला भविष्यात अनेक गंभीर प्रसंगांना सामोरे जावे लागेल अशी भीती विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली.राज्याचा कारभार ज्या इमारतीतून हाकला जातो, त्या मंत्रालयात शरद पवारांच्या नावाने सिल्व्हर ओक बंगल्यातून फोन खणाणला, “मी सिल्व्हर ओक मधून शरद पवार बोलतोय.” असा आवाज काढत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भात हा फोन करण्यात आला असून त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला आहे. त्यावर बोलताना दरेकर म्हणाले, पवार साहेब अशाप्रकारचे कधीचं फोन करणार नाहीत, हे महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे. परंतु आज त्यांच्या आवाजात फोन करून दुरुपयोग करणं हे अत्यंत निंदनीय आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.